वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर व जिल्ह्यातील जवळपास एक कोटी रहिवाशांची तसेच हवेली, दौंड, इंदापूर आदी तालुक्यातील 66 हजार हेक्टर शेतीची तहान भागवणार्या खडकवासला धरणसाखळीत गतवर्षी पेक्षा 10 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. रविवारी (दि. 5) दिवस अखेर चार धरणांच्या साखळीत 7.54 टीएमसी म्हणजे फक्त 25 . 88 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 5 मे 2023 रोजी धरणसाखळीत 10.34 टीएमसी म्हणजे 35.46 टक्के पाणी होते.गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असल्याने प्रशासनासमोर पाणी कपातीचे आवाहन उभे आहे.
सध्या शेतीसाठी सध्या उन्हाळी आवर्तन सुरू आहे. धरणांतील पाण्याची पातळी खाली गेल्याने पानशेतची पातळी माणगाव, शिरकोलीपर्यंत खाली गेली आहे. रुळे, जांबली येथील मोसे नदीचे पात्र उघडे पडले आहे. उघड्या पडलेल्या धरण क्षेत्रात गाळ, मातीचे तांडे दिसत आहेत. गेल्या महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढल्याने धरणातील पाण्यात घट सुरू आहे. शेती तसेच पिण्यासाठी पाणी सोडले जात असल्याने धरणांतील पाण्याची पातळी दर तासागणिक खाली जात आहे. खडकवासलातून शेतीसाठी 1105 क्सुसेक्स व पिण्यासाठी 580 क्सुसेक्स पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पानशेत व वरसगाव धरणातून खडकवासला धरणात प्रत्येकी 600 क्सुसेक्स पाणी सोडले जात आहे. त्यामुळे दोन्ही धरणांतील पाण्याची पातळी खाली गेली आहे. पानशेतमध्ये 2.52 टीएमसी म्हणजे केवळ 23.67 टक्के, तर वरसगावमध्ये 3.86 टीएमसी म्हणजे 30.14 टक्के पाणी आहे.
टेमघर धरण जवळपास कोरडे पडले आहे. टेमघरमध्ये 5.86 टक्के पाणी आहे. पानशेत व वरसगावमधून पाणी सोडल्याने खडकवासलातील पाण्याची पातळी 47. 70 टक्के इतकी आहे. खडकवासलात 0.94 टीएमसी पाणी आहे.
गतवर्षीच्या तुलनेत खडकवासला साखळीत कमी पाणी असल्याने आगामी काळात पाण्याच्या बचतीवर भर दिला जाणार आहे. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा.
– मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, जलसंपदा विभाग
हेही वाचा