टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यात उन्हाळ्याच्या उष्णतेने कहर केला आहे. मानवांबरोबरच वन्यप्राणी, पशू-पक्ष्यांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. भटकंती करताना प्राणी विहिरीत पाणी पिण्यासाठी जाताना दिसत आहेत व त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येत आहे. अशा काही घटना घडल्या आहेत. वन्यप्राणी, पशुपक्ष्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी वन विभागाच्या वतीने टँकरद्वारे पाणवठ्यांमध्ये नियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. चिंचोली मोराची या परिसरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून, या ठिकाणी अनेक प्रकारचे कोल्हे, लांडगे, तरस, ससे आदी वन्यप्राण्यांसह मोर व इतर पशू-पक्ष्यांचा अधिवास आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने या भागात असणारे ओढे, नाले, पाणवठे आटू लागले आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधासाठी वन्यप्राणी, पशुपक्ष्यांची भटकंती वाढत आहे.
पाण्याचा शोध घेत फिरताना अनेकदा मानवाबरोबरच संघर्ष करावा लागत आहे. तसेच त्यांना विहिरीत पडून जिवासही मुकावे लागत आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गणेश पवार, वनरक्षक नारायण राठोड व वनमजूर हनुमंत कारकूड हे वन क्षेत्रात, तसेच लगतच्या भागातील पाणवठ्यांवर काही दिवसांच्या अंतराने 20 हजार लिटरच्या टँकरने पाणी टाकण्याचे काम करीत आहेत. ते पाणवठे काठोकाठ भरण्यात येत आहेत. हे पाणवठे आटणार नाहीत, याची दक्षता वन विभागाकडून घेतली जात आहे. त्यामुळे वन्यप्राणी, पशू-पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबण्यास मदत झाली आहे. दरम्यान, वन्यप्राण्यांसह पशू-पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची आपापल्या परीने सोय करून वन्यप्रेमींनी खारीचा वाटा उचलावा, असेच आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा