ढगाळ हवामानाने कांदा उत्पादकांची चिंता वाढली; बराकी बांधण्याची कामे सुरू | पुढारी

ढगाळ हवामानाने कांदा उत्पादकांची चिंता वाढली; बराकी बांधण्याची कामे सुरू

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात शुक्रवारी (दि. 12) सकाळपासूनच ढगाळ हवामानाचे सावट निर्माण झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. काढलेला कांदा शेतामध्येच आहे. तो पावसाने भिजू नये, यासाठी शेतकर्‍यांनी बराकी बांधण्याची कामे हाती घेतली आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात कांदा काढणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. अनेक शेतकर्‍यांचे काढणी केलेले कांदे शेतामध्येच उघड्यावर आहेत. शुक्रवारी सकाळपासून या परिसरात ढगाळ हवामानाचे सावट निर्माण झाले आहे. जर अवकाळी पाऊस पडला तर कांदे भिजून मोठे नुकसान होईल. या चिंतेत कांदा उत्पादक शेतकरी आहेत.

कांदा भिजू नये, यासाठी शेतकर्‍यांनी नवीन बराकी तयार करण्याची कामे वेगात सुरू केली आहेत. बराकी दीर्घकाळ टिकाव्यात, यासाठी शेतकरी लोखंडाचा वापर करताना दिसत आहेत. परंतु, लोखंडाचे भावही गगनाला भिडल्याने अनेक शेतकर्‍यांनी बराकीसाठी लाकडे, पाचट, बांबूंचा वापर सुरू केला आहे. नवीन काढणी केलेल्या कांद्याला बाजारभाव समाधानकारक मिळत नाही. सध्या नवीन कांद्याला 10 किलोला 120 ते 140 रुपये बाजारभाव मिळत आहे. कांदा पिकासाठी गुंतविलेल्या भांडवलाच्या तुलनेत सध्याचा बाजारभाव शेतकर्‍यांना परवडणारा नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी कांदा साठवायला सुरुवात केली आहे. ढगाळ हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता धास्तावले आहेत.

हेही वाचा

Back to top button