

उदय पोवार
येरवडा(पुणे) : वडगावशेरी परिसरात पाणीकपात सुरू असताना टँकर भरणा केंद्रावरून गुरुवारी पहाटे बांधकाम साइट, सोसायट्या, हॉटेल आदी खासगी ठिकाणी पाणी विकले आहे. दै.'पुढारी'च्या 'स्टिंग ऑपरेशन'मध्ये हा प्रकार समोर आला. सुमारे सात टँकरमध्ये पाणी भरून ते विकण्यात आले. महापालिकेच्या ठेकेदाराने हा गैरप्रकार केला असून, त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
महापालिकेच्या वडगावशेरी येथील टँकर भरणा केंद्रावर बुधवारी (दि.12) रात्री ठेकेदाराचे टँकर पार्किंग केले होते. रात्रीच्या वेळी या टँकरमध्ये पाणी भरले गेले. गुरुवारी सकाळी 6 वाजेनंतर टँकरचालक आल्यानंतर ठेकेदार जशा सूचना देईल, तसे हे टँकर खासगी ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी पाठविण्यात आले.
पोरवाल रस्त्यावरील बांधकाम साइट, कल्याणीनगरमधील सिद्धार्थ इस्टेट सोसायटी आदी ठिकाणी हे टँकर गेल्याचे समोर आले. परिसरात गुरुवारी पाणी कपात असताना या टँकरमध्ये पाणी भरण्यात आले आणि ते खासगी ठिकाणी 2200 रुपयांना जादा दराने विकल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठेकेदारांना पाण्यासाठी महापालिकेचे 634 रुपयांचे कूपन (चलन) भरावयाचे असते. तर नागरिकांसाठी 882 रुपयांचे कूपन असते. या कूपनाद्वारे एकावेळेस 10 हजार लिटर पाणी मिळते. या कूपनावर स्वारगेट केंद्रातून पाणी भरण्याचा उल्लेख असताना, ते अंतर लांब असल्यामुळे टँकरच्या कमी खेपा होतात. त्यामुळे संबंधित ठेकेदाराच्या फायद्यासाठी वडगाव शेरी येथील केंद्रवर टँकर भरण्यात आले आणि ते पाणी खासगी ठिकाणी विकल्याचे या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे.
हेही वाचा