बारामती : वारकर्‍यांनी कालव्याच्या घाटांचाच वापर करावा ; जलसंपदा विभागाचे आवाहन

बारामती : वारकर्‍यांनी कालव्याच्या घाटांचाच वापर करावा ; जलसंपदा विभागाचे आवाहन

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  बारामती शहरात निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण झालेले असल्याने पालखी सोहळ्यात सहभागी वारकर्‍यांनी घाटांचाच वापर करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता अश्विन पवार यांनी केले आहे.
बारामती शहराच्या हद्दीत निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण झालेले आहे. सध्या कालवा पूर्ण क्षमतेने सुरू आहे. अस्तरीकरणामुळे पाण्याचा वेग अधिक आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने आवश्यक ती दक्षता घेतली आहे. आंघोळ किंवा कपडे धुण्यासाठी कालव्यात न उतरण्याचे तसेच गरज भासल्यास घाटांचा वापर करूनच कालव्यात उतरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

निरा डावा कालव्याचे बारामती शहरात बहुतांश ठिकाणी अस्तरीकरण झालेले आहे. त्यामुळे कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहाला कमालीचा वेग आहे. त्यामुळे वारकर्‍यांनी तसेच नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. निरा डावा कालव्यावर पाच ते सहा ठिकाणी पायर्‍या असलेले घाट आहे. या घाटाच्या ठिकाणीच वारकर्‍यांनी अंघोळ किंवा कपडे धुण्यासाठी उतरण्याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
उपविभागीय अभियंता अश्विन पवार यांनी सांगितले की, जागोजागी फलक लावून जलसंपदा विभागाने जनजागृती केली आहे. नगरपरिषदेच्या जीवरक्षक दलाबरोबरच जलसंपदा खात्याचे कर्मचारी थांबविण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी वारकर्‍यांनी काळजी घ्यावी.

निरा डावा कालव्याचे दुसरे आवर्तन सुरू आहे. पालखी सोहळा आगमनाच्या काळात हे आवर्तन सुरू राहणार आहे. त्यामुळे वारकरी भाविकांना अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी पाण्याची कमतरता भासणार नाही. जलसंपदा खात्याच्या प्रत्येक वितरिकेला पालखी सोहळ्याच्या मुक्कामादरम्यान पाणी सोडले जाईल. बारामतीपासून निमगाव केतकीपर्यंत निरा डावा कालव्याला पाणी सुरू राहणार आहे.

निरा डावा कालव्यात कोणीही उतरू नये. कालव्यावर जीवरक्षक पथक नेमण्यात येणार आहे. चोवीस तास हे पथक कार्यरत असणार आहे. तसेच, मावळच्या जीवरक्षक पथकालादेखील आमंत्रित करण्यात येणार आहे.
                                         – महेश रोकडे, मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news