पुणे : ‘बंगल्यांचा वॉर्ड’ समस्यांनी ग्रासला; निधीअभावी बहुमजली पार्किंग इमारत रखडलेलीच

पुणे : ‘बंगल्यांचा वॉर्ड’ समस्यांनी ग्रासला; निधीअभावी बहुमजली पार्किंग इमारत रखडलेलीच
Published on
Updated on

समीर सय्यद

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील 'बंगल्यांचा वॉर्ड' अशी ओळख असलेल्या 'सोलापूर बाजार-क्रॉस रोड' वॉर्ड क्रमांक पाचमधील महत्त्वाकांक्षी असलेला बहुमजली वाहनतळ प्रकल्प निधीअभावी रखडलेलाच आहे. तसेच सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी, पदपथांची दुरवस्था, वाढीव 'एफएसआय'च्या प्रतीक्षेतील पुनर्विकास आणि दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेले बंगले अशा अनेक समस्यांनी वॉर्ड ग्रासला आहे.

नेपियर रस्ता, स्टेव्हलीस रोड, कोयाजी रस्ता, कॅस्टेलिनो रस्ता, सिल्व्हर ज्युबिली रोड, अर्जुन मार्ग हा बंगल्यांचा भाग; तर सोलापूर बाजार, आरएसआय क्वार्टर्स ही बैठी घरे आणि इमारतींमध्ये राहणारी लोकवस्ती मिळून हा वॉर्ड तयार झाला आहे. भौगोलिकदृष्ट्या हा वॉर्ड सर्वांत मोठा आहे. ब्रिटिश काळापासूनची येथे अनेक घरे, बंगले आहेत. मात्र, त्यांची दुरुस्ती व पुनर्विकास रखडला आहे.

उड्डाणपूल कागदावरच..
सोलापूर बाजार परिसरात पाळीव जनावरे रस्ते अडवून बसतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. भगतसिंग उद्यानातील खेळणी नाहीशी झाली आहेत. सोलापूर रस्त्यावर पदपथ, कन्याशाळा परिसरात पावसाळी वाहिन्यांची आवश्यकता आहे. गोळीबार मैदान चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बोर्डाच्या विकास आराखड्यात (सीडीपी) प्रस्तावित उड्डाणपुलाची योजना कागदावरच आहे.

ऐतिहासिक वारशाकडे दुर्लक्ष
पुलगेट परिसरात घाशीराम कोतवाल यांचा वाडा; तर कोयाजी रस्त्यावर मराठा वॉर मेमोरियल, स्टेवली रस्त्यावर असलेली 'सेंट मार्गारेट' ही पहिली मराठी शाळा आहे. या ऐतिहासिक वास्तूंकडे बोर्डाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. किमान या वारशाची माहिती देणारे फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक (गोळीबार मैदान) ते सोलापूर रस्त्यावरील महात्मा गांधी बसस्थानक ते सोलापूर बाजार पोलिस चौकी मार्गावर एकेरी वाहतूक आहे. त्याचा फटका सोलापूर बाजार परिसरात वास्तव्यास असणार्‍या नागरिकांना बसत आहे. दररोज सकाळी-सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते; परंतु या प्रश्नावर गेल्या काही वर्षांत काहीही निर्णय झालेला नाही.

                                      – शिरीष अगुरेड्डी, सामाजिक कार्यकर्ते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news