

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात पाण्याखाली जाण्यामुळे नेहमीच चर्चेत असलेला मुठा नदीपात्रातील बाबा भिडे पूल सध्या येथे होणार्या वाहतूक कोंडीने चर्चेत आला आहे. भिडे पुलावरून जायचयं ? तर पुणेकर वाहनचालक म्हणतात, नको रे बाबा…! गेल्या आठवडाभरापासून येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, सोमवारी सायंकाळीही अशाच कोंडीचा पुणेकरांना अनुभव आला.
मध्यवस्तीतून बाबा भिडे पूलमार्गे जंगली महाराज रस्त्यावर जाण्यासाठी रस्ता आहे.
हा रस्ता पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे काही दिवस बंद असतो. मात्र, इतर वेळी या पुलावरून वाहनांची वर्दळ कायमच असते. येथे सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे सध्या या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, वाहनचालक या कोंडीत तासन्तास अडकून पडत आहे. त्यातच येथे वाहनांच्या रांगा मध्यवस्तीच्या दिशेने आणि खिलारे वस्तीकडे जाणार्या नदीपात्राच्या रस्त्यावर लागलेल्या पाहायला मिळत आहे.
भिडे पुलावर सदाशिव पेठेच्या बाजूला तीन बाजूंनी वाहने येतात आणि पूल सुरू होतो, त्याठिकाणी गर्दी होते. विशेषत: सायंकाळनंतर येथून वाट काढताना वाहनचालकांची तारांबळ उडते. एकाचवेळी दुचाकी, रिक्षा समोरासमोर बराच वेळ रस्ता मिळण्यासाठी वाट पाहात राहतात. यातूनच अनेकांचे एकमेकांशी खटके, शाब्दिक चकमकी उडतात. त्यातच काही दुचाकीचालक शेजारचा पदपथही व्यापतात आणि पादचाऱ्यांना चालण्यासही वाव मिळत नाही. या रस्त्यापासून काही अंतरावरच अलका टॉकीज चौकाजवळील सिग्नलजवळ सायंकाळी चार ते पाच पोलिस वाहतूक नियंत्रण करत असतात, त्यांना भिडे पुलाजवळील हे दृश्य कधी दिसणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाहतूक पोलिसांची नेमणूक करा…
येथील कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि किमान दोन वाहतूक पोलिसांची या ठिकाणी नेमणूक करावी, अशी मागणी वाहचालकांकडून करण्यात येत आहे.