पारगाव : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात कांदालागवडी करणार्या महिला मजुरांनी दिवसाची मजुरी वाढवली आहे. पंधरा दिवसांपूर्वी तीनशे रुपये महिलांना दिवसाची हजेरी मिळत होती. आता त्यामध्ये पन्नास रुपयांनी वाढ होऊन आता 350 रुपये हजेरी द्यावी लागत आहे. तालुक्याच्या पूर्वभागात गेल्या एक-दीड महिन्यापासून रब्बी हंगामातील कांदालागवडी जोरात सुरू आहेत. या परिसरात दरवर्षी कांदालागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. एका वेळेस अनेक शेतकर्यांच्या कांदालागवडींची कामे सुरू होत असल्याने मजुरांचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे शेतकरी शेजारील खेड, शिरूर, जुन्नर तालुक्यातील मजुरांच्या टोळ्या आणतात.
त्यासाठी वाहन भाड्यासहित अधिक पैसे मोजावे लागतात. त्यातच आता मजूर महिलांनी मजुरीचे दर वाढवले आहेत. 10-15 दिवसांपूर्वी एका दिवसाची हजेरी 300 रुपये होती. त्यानंतर मागील आठवड्यात मजुरीत वाढ झाली. आता दिवसाच्या हजेरीत 50 रुपयांनी वाढ होऊन 350 रुपये इतकी झाली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील पारगाव, शिंगवे, रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे आदी गावांमध्ये खेड तालुक्यातील गोसासी, कन्हेरसर आदी गावांतील मजूर महिला कांदालागवडीसाठी येत आहेत.