

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे जोमात आलेल्या मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये नुकतीच खांदेपालट झाली असून लवकरच संपूर्ण कार्यकारिणी व सर्व सेलचीही खांदेपालट होणार आहे.
या पार्श्वभूमीवर आता मावळ राष्ट्रवादीच्या शिफारशीशिवाय तालुक्यातील कोणालाही प्रदेश, जिल्हा पातळीवरील पद देऊ नये, असा नवा अजेंडा काढला असून, या विषयी निर्णय घेण्याबाबतचे लेखी पत्र प्रदेशाध्यांना पाठविण्यात आले आहे.
तब्बल 25 वर्षानंतर मावळात आमदार सुनील शेळके यांच्या रूपाने सत्तेवर आलेल्या राष्ट्रवादीला उभारी मिळाली. सत्ता आल्याने तालुक्यात होत असलेली विकासकामे, विविध शासकीय समित्यांवर मिळत असलेले स्थान, सोसायटी, ग्रामपंचायत सारख्या निवडणुकांमध्ये मिळालेले यश यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चैतन्याचे वातावरण आहे.
दरम्यान, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार व आमदार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटनेत खांदेपालट करण्यास सुरुवात झाली असून, गणेश खांडगे यांच्यावर तालुक्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
त्यानंतर कार्याध्यक्षपदी साहेबराव कारके, तर युवक अध्यक्षपदी किशोर सातकर यांची निवड करण्यात आली. आता लवकरच पक्षातील महिला, युवती, विद्यार्थी, ओबीसी, अल्पसंख्याक, कामगार,
सामाजिक न्याय, वकील अशा विविध सेलच्या प्रमुख पदाधिकार्यांमध्येही खांदेपालट करण्यात येणार असून त्यादृष्टीने काम करण्यास इच्छुक असणारांचे अर्ज मागवणे, मुलाखती घेणे आदी प्रक्रिया सुरू आहे व लवकर या सर्व नियुक्त्या तसेच तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.
पक्षाला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आमदार शेळके, तालुकाध्यक्ष खांडगे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे, विठ्ठलराव शिंदे, बबनराव भेगडे यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाच्या प्रदेश व जिल्हा पातळीवर मावळ राष्ट्रवादीच्या शिफारशीशिवाय तालुक्यातील कोणालाही पद देऊ नये असा निर्णय घेऊन यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही लेखी पत्र पाठविण्यात आले आहे.
यापूर्वी, राष्ट्रवादीमध्ये मावळातील अनेक पदाधिकार्यांच्या प्रदेश, जिल्हा कार्यकारिणीमध्ये थेट नियुक्त्या झाल्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे क्रियाशील कार्यकर्ते व स्थानिक पातळीवर नाराजीही होत होती व याचा फटका पक्ष संघटनेला बसत होता. हीच बाब लक्षात घेऊन कोअर कमिटी घेतलेल्या या नव्या अजेंड्यामुळे आता अशा थेट नियुक्त्यांना लगाम बसणार आहे.
आगामी काळात पक्ष संघटना प्रत्येक गावात व प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्याचा दृष्टीने 'राष्ट्रवादी आपल्या दारी' ही मोहीम सुरू करण्यात येणार असून तालुक्यातील कार्यक्षम, प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षसंघटनेच्या मुख्य प्रवाहात आणणार आहे.
-गणेश खांडगे, अध्यक्ष,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस