पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायकांना रविवारी (दि.12) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पहिले प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक निरिक्षक एस. सत्यनारायण, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी व निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणासाठी 3 हजार कर्मचारी सहभागी झाले.
प्रशिक्षणामध्ये मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. मार्गदर्शक सूचना, विविध शासन निर्णय, मतदान यंत्रांची हाताळणी व जोडणी कशा पद्धतीने करावी, मतदान यंत्राबाबत तांत्रिक माहिती, मतदान साहित्याची ओळख, मतदान प्रक्रियेवेळी घ्यावयाची काळजी, निवडणूक प्रक्रियेसंबंधी असलेली नियमावली, निवडणूकीची कार्यपद्धती आणि कार्यप्रणाली, विविध नमुन्यांमध्ये भरावयाची माहिती, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे कर्तव्ये व जबाबदारी आदींबाबत या माहिती देण्यात आली. ईव्हीएम यंत्र हाताळण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणार्थींनी उपस्थित केलेले प्रश्न व शंकांचे निरसन करण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी या प्रशिक्षणात निवडणूक कर्मचार्यांना कामकाजाविषयी सूचना दिल्या. नियमांचे पालन करुन सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पाडणे, मतदानकेंद्र निहाय नेमण्यात आलेल्या टीमने ईव्हीएम यंत्र हाताळणी व्यवस्थित करणे, विविध नमुन्यातील माहिती योग्य पद्धतीने भरणे आदी सूचना त्यांनी केल्या.