पुणे : गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून विठ्ठलवाडी शाळेचा दबदबा

पुणे : गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून विठ्ठलवाडी शाळेचा दबदबा
Published on
Updated on

रामदास डोंबे :

खोर (पुणे ) : पुणे जिल्ह्याच्या नकाशावर नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रभर गुणवत्तापूर्ण व सर्वाधिक उपक्रमशील शाळा कोणती, असे म्हटले की, दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा गावातील विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आपल्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून या शाळेने थेट संसदेमध्ये मजल मारून आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. एका उजाड माळरानावर गावकर्‍यांच्या सहकार्यातून येथे शिक्षणाचे नंदनवन फुलले आहे. या शाळेची स्थापना 1988 मध्ये झाली. सुरुवातीला बाळासो बारवकर यांच्या घरी कुडाच्या भिंतीत सुरू झालेल्या या शाळेत आता भव्य प्रवेशद्वार, कलामंच, लॉन, प्रोजेक्टर, प्रिंटर, ऑटर फिल्टर, कार्यालय, कॉम्प्युटर, बोलक्या भिंती, डेस्क आदी सोयी-सुविधा आहेत.

या शाळेतील शिक्षक युवराज घोगरे यांच्या संकल्पनेला ग्रामस्थांनी साथ दिल्यामुळे हे परिवर्तन घडले. आज या शाळेची गुणवत्ता लक्षवेधी आहे. या शाळेस दोन राज्यस्तरीय 'आदर्श शाळा' पुरस्कार मिळाले आहेत. आतापर्यंत या शाळेने महाराष्ट्रात सर्वांत जास्त 59 बक्षिसे मिळवली आहेत. गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पालक व ग्रामस्थ यांचे शाळेस नेहमीच सहकार्य असते. या शाळेत 31 मुले आणि 32 मुली, अशी एकूण 63 बालके शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

शाळेची वैशिष्ट्ये
या शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम व नावीन्यपूर्ण उपक्रम, यामुळे ही शाळा महाराष्ट्रभर ओळखली गेली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच शाळेचा ध्यास आहे. गावकर्‍यांच्या सहकार्यातून उभ्या राहिलेल्या या शाळेच्या परिसराचा व्हिडीओ फेसबुकवर सुमारे 30 लाख वेळा पाहिला गेला व दहा हजार लोकांनी शेअर केला आहे.

आज महाराष्ट्रभर गाजत असलेल्या शाळेत माझी बदली झाली, याचा मला खूप आनंद आहे. मी या शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करेन. या शाळेच्या प्रगतीसाठी मी सर्वांना सोबत घेऊन पुढील प्रगतीचे ध्येय नक्कीच पूर्ण करेन.
                             -दत्तात्रय दिवेकर, मुख्याध्यापक, विठ्ठलवाडी शाळा

आमच्या घरी कुडाच्या भिंतीत सुरू झालेल्या या शाळेत परिवर्तन आमच्या वाडीतील गावकर्‍यांच्या सहकार्यातून झाले आहे. यात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे, याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
                                  अतुल बारवकर, माजी अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती

आमची शाळा माळरानावर आहे. परंतु, आम्ही सरपंच, ग्रामपंचायत, ग्रामस्थ व शाळेतील शिक्षक यांच्या मदतीने शाळेस प्रगतिपथावर पोहचविले. युवराज घोगरे या प्रामाणिक शिक्षकाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत.
                                  -डी. डी. बारवकर, माजी सरपंच, देऊळगावगाडा

शाळेच्या विकासात शाळेतील शिक्षक युवराज घोगरे यांचे योगदान मोलाचे आहे. आमच्या शाळेत फक्त पुस्तकी ज्ञानावर भर न देता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो. त्यामुळेच आमचे विद्यार्थी नृत्य, नाट्य, वक्तृत्व आदी गोष्टींत यशस्वी ठरले आहेत.
                                                    -रमेश गिरमे, ग्रामस्थ, देऊळगावगाडा

विठ्ठलवाडी शाळा व्यवस्थापन समितीने समृद्ध शाळा उभी करण्यासाठी 'ज्ञानकुल' हा प्रकल्प मंजूर केला आहे. यासाठी 2 कोटी 34 लाख रुपये निधीची आवश्यकता आहे. या भव्य प्रकल्पाच्या बांधकामासाठी निधीची प्रतीक्षा आहे.
                                युवराज घोगरे, शिक्षक, विठ्ठलवाडी जिल्हा प्राथमिक शाळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news