

Vishnudas Suryavanshi lottery ticket collector
सुवर्णा चव्हाण
पुणे: आयुष्यात एकदातरी लॉटरी लागावी, हे प्रत्येकाचेच स्वप्न असते... त्यांनीही हेच स्वप्न पाहिले अन् 55 वर्षांपूर्वी लॉटरीचे तिकीट विकत घ्यायला सुरुवात केली. एकदा दहा हजार रुपयांची लॉटरीही लागली अन् त्यांनी आनंदोत्सव साजरा केला... पण, हीच आवड त्यांच्यासाठी छंद बनली अन् त्यांनी लॉटरी तिकिटांचा छंद जोपासत तब्बल आठ हजार 750 लॉटरी तिकिटांचा संग्राह केला आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरी तिकिटांचा संग्राह करणारे हे संग्राहक आहेत 79 वर्षीय विष्णुदास सूर्यवंशी.
1971 सालापासून सुरू झालेला त्यांचा लॉटरी तिकिटांच्या संग्राहाचा प्रवास आज 2025 पर्यंत येऊन पोचला असून, हा अनोखा संग्राह प्रदर्शनाच्या माध्यमातून पुणेकरांसमोर आणण्याची त्यांची इच्छा आहे. (Latest Pune News)
कधीतरी आपल्यालाही लॉटरी लागावी, या विचाराने अनेकजण लॉटरीचे तिकीट विकत घेतात. सूर्यवंशी यांनी आपल्या कुटुंबात पाहिलेल्या हलाखीच्या परिस्थितीमुळे कधीतरी आपल्यालाही लॉटरी लागेल आणि आपल्या आयुष्याला स्थैर्य मिळेल, या विचाराने लॉटरीचे तिकीट घ्यायला सुरुवात केली.
ही आवड जोपासत त्यांनी महाराष्ट्र राज्य लॉटरी तिकिटांचा संग्राह करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या संग्राहात अगदी 50 पैशांपासून ते थेट 500 रुपयांपर्यंतची तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटाचे एक वैशिष्ट्य आहे.
काही तिकिटे ही सण-उत्सवावर आधारित आहेत तर काही तिकिटांवर वन्यप्राण्यांची चित्रे आहेत... तसेच काही तिकिटांवर अभिनेत्रींची छायाचित्रे आहेत तर काही तिकिटांवर वेगवेगळी चित्रे पाहायला मिळतील. त्यांच्या संग्राहात पाच लाखांपासून 51 लाखांपर्यंतच्या वेगवेगळ्या रकमांची लॉटरीची तिकिटे आहेत.
या संग्राहाबद्दल सूर्यवंशी म्हणाले, हलाखीची परिस्थिती असल्याने मला आयुष्यात पैसे कमावून मोठे व्हायचे होते. त्यामुळे मी लॉटरीचे तिकीट विकत घ्यायला सुरुवात केली. तेव्हा 50 पैसे, एक रुपया, दोन रुपयांपर्यंत तिकिट मिळायचे अन् आज थेट पाचशे रुपयांचे तिकिट मिळते. सुमारे 55 वर्षांपूर्वी सुरू झालेली ही आवड आतापर्यंत टिकून आहे. पण, इतक्या वर्षांत सुमारे दोन लाख रुपयांहून अधिक पैसे खर्च करून मी हा मौल्यवान ठेवा जमा केला आहे. हा ठेवा जुन्या काळाची साक्ष देणारा आहे.
मी मूळचा पुण्यातील इंदापूरचा. मी 2007 साली सदर्न कमांडमधून अधीक्षक पदावरून निवृत्त झालो. त्यानंतरही 2023 पर्यंत मी येथेच काम करत होतो. आज मी 79 वर्षांचा असून, आज या संग्राहाकडे पाहताना खूप आनंद होतो. आजही मी तिकिट विकत घेतो, ते संग्राहासाठी. लॉटरीचे तिकिट विकत घेण्याची आवड तरुणाईने मर्यादित स्वरूपात जोपासावी, त्याचा अतिरेक करू नये, असे माझे तरुणाईला सांगणे आहे.
- विष्णुदास सूर्यवंशी, लॉटरी तिकिटांचे संग्राहक