Restrictions on tender conditions Maharashtra
पुणे: महापालिकेच्या निविदा प्रकियेतील गोलमाल टाळण्यासाठी आता निविदा शिफारस समिती स्थापन केली आहे. त्यानुसार 1 कोटी व त्यावरील रक्कमेच्या निविदांसाठी संबधित विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेणार आहे.
तर 25 लाख ते 1 कोटींच्या निविदापर्यंतच्या रक्कमेच्या निविदांसाठी विभाग प्रमुख्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्यामुळे आता निविदांच्या अटी-शर्ती मनमर्जीपणे टाकता येणार नाहीत. (Latest Pune News)
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या समित्यांच्या स्थापनेचे आदेश गुरुवारी दिले. महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधींची विकास कामे केली जातात. या सर्व कामांसाठी ऑनलाईन पद्धतीने निविदा प्रकिया राबवून त्यानुसार पात्र ठेकेदारांना कामे दिली जातात.
मात्र, गेल्या काही वर्षांत मर्जीतील ठेकेदारांना काम मिळावे यासाठी संबधित अधिकार्यांकडून त्याला सोईच्या ठरेल आणि प्रतिस्पर्धी ठेकेदार अपात्र ठरेल अशा पद्धतीच्या अटी-शर्ती टाकल्या जात असल्याचे काही प्रकार समोर आले होते.
त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी आयुक्त राम यांनी थेट आता निविदा समिती स्थापन केली आहे. त्यानुसार विकासकामांच्या रक्कमेचे टप्पे निश्चित केले असून, त्यानुसार संबधित समिती निविदांमधील अटी-शर्तीसह सर्व प्रकिया निश्चित करण्याचे काम करणार आहे. या समितीची बैठक प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी व गुरुवारी होणार आहे.
25 लाख व 1 कोटींपर्यंतची कामे
25 लाखांपासून 1 कोटींपर्यंतच्या विकास कामांसाठी विभाग प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली समिती असणार आहे. या समितीत दक्षताचे उपायुक्त, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी, उप मुख्यलेखा परिक्षक, उप अभियंता, संबधित कनिष्ठ अभियंता हे सदस्य असणार आहेत.
25 लाखांपर्यंतची कामे
25 लाखांपर्यंतची कामांसाठी विभाग प्रमुखांच्या अध्यक्षतेखालील समितीत सहायक आयुक्त, उपअभियंता, अंतर्गत अर्थान्विक्षक व संबधित कनिष्ठ अभियंता हे सदस्य आहेत.
1 कोटी व त्यावरील कामांसाठीची समिती
1 कोटी व त्यावरील रक्कमेच्या कामांसाठी महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीत केवळ बांधकाम विभागाशी संबंधित विषय असतील तर शहर अभियंता, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, उपआयुक्त दक्षता विभाग व संबंधित विभागप्रमुख हे सदस्य असणार आहेत.