पिंपरी : आरटीई विद्यार्थ्यांशी शाळांमध्ये दुजाभाव

पिंपरी : आरटीई विद्यार्थ्यांशी शाळांमध्ये दुजाभाव
Published on
Updated on

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : 'आरटीई' च्या विद्यार्थ्यांना इतर वर्गात समाविष्ट करणे हे 'आरटीई' च्या कायद्याचे उल्लंघन आहे. 'आरटीई' कायद्यामध्येही तशी कोणतीही तरतूद नसतानाही पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश खासगी शाळांकडून जाणूनबुजून 'आरटीई' च्या विद्यार्थ्यांना दुजाभावाची वागणूक देत असल्याच्या तक्रारी पालक करत आहेत. तसेच विविध अ‍ॅक्टिव्हीटीजच्या नावाखाली पैसे घेतले जात असल्याचेही पालकांचे म्हणणे आहे.

शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जात आहेे. त्यामुळे पालकांच्या रांगा लागतात. पर्यायाने भरमसाठ फी देणार्‍या पालकांच्या पाल्याला सकाळच्या सत्रात प्रवेश दिला जातो. उर्वरित दुपारच्या सत्रात प्रवेश दिले जातात. मात्र, 'आरटीई' च्या पालकांना निवड करण्याचा अधिकार नाही. त्यांच्या पाल्यांना सरसकट दुपारच्याच सत्रात प्रवेश दिला जातो.

आरटीईतून प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना सकाळ अथवा दुपार सत्र निवडीची संधी न देताच 'आरटीई' तून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा वेगळा वर्ग भरवला जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. अशाप्रकारे शाळांना 'आरटीई'च्या विद्यार्थ्यांशी दुजाभावाची वागणूक देण्याचा कोणताही अधिकार नाही. तरीही, विद्यार्थ्यांना अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

शाळांमध्ये सकाळच्या सत्रातील वर्गांसाठी प्रशिक्षित शिक्षक असतात, तर दुपारच्या सत्रातील वर्गांसाठी प्रशिक्षणार्थी शिक्षक असल्यामुळे शिक्षणाच्या दर्जामध्ये देखील फरक पडत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. जे पालक आपल्या पाल्यांचे हजारो रुपये भरून प्रवेश घेतात त्यांच्यासाठी चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, म्हणून सकाळच्या सत्रात वर्ग भरविले जातात, तर दुपारच्या सत्रासाठी प्रशिक्षणार्थी शिक्षक असल्यामुळे दुपारचे वर्ग असा फरक केला जात आहे. काही ठिकाणी तर आरटीईच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी इमारत असल्याचीही तक्रार पालकवर्ग करतात. शाळा 'आरटीई'चे विद्यार्थी अप्रगत आहेत म्हणून वेगळा वर्ग करतात. तर, शाळेत खुल्या वर्गात प्रवेश घेतलेले सर्वच विद्यार्थी हुशार असतात का, हा प्रश्नच आहे.

शाळा काय म्हणतात ?

शासनाकडून 'आरटीई' चे प्रवेश उशिरा होतात. तोपर्यंत शाळेतील सर्व वर्गातील प्रवेश पूर्ण झालेले असतात. त्यामुळे आम्हाला 'आरटीई' च्या मुलांसाठी वेगळे वर्ग भरवावे लागतात; तसेच 'आरटीई'चे विद्यार्थी हे अप्रगत असतात. त्यामुळे ते इतर मुलांच्या बरोबरीने शिकू शकत नाहीत. इतर विद्यार्थ्यांचा अभ्याक्रमही पुढे गेलेला असतो. म्हणून आम्ही त्यांच्या कलाने शिकविण्यासाठी वेगळे वर्ग आणि शिक्षकांची नेमणूक करतो.

शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीई किंवा इतर कोणत्याही खुल्या प्रवेशातील विद्यार्थ्यांबाबत कोणत्याही प्रकारे दुजाभावाची वागणूक करता येणार नाही. ज्या सुविधा खुल्या प्रवेशातील विद्यार्थ्यांना मिळतात त्याच सुविधा 'आरटीई' माध्यमातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील मिळायला पाहिजेत.

– डॉ. शरद जावडेकर,
अध्यक्ष, आरटीई कृती समिती

आरटीईच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळे वर्ग करणे हे पूर्णत: चुकीचे धोरण आहे. असे प्रकार कोणतीही शाळा करू शकत नाही, असे केल्यास शाळांची मान्यता रद्द होऊ शकते. असे कोणत्या पालकांच्या बाबतीत घडले असल्यास त्यांनी आमच्याकडे लेखी तक्रार द्यावी.

– संजय नाईकडे,
प्रशासन अधिकारी,
महापालिका शिक्षण विभाग

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news