पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील काही रस्त्यांवर पे अॅण्ड पार्क योजना रडतखडत सुरू आहे. मात्र, नो पार्किंगमधील वाहने उचलताना महापालिकेने नेमलेल्या ठेकेदाराच्या कर्मचार्यांकडून नियमांकडे दुर्लक्ष करीत कारवाई केली जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील रस्त्यांवर नो पार्किगमधील वाहने उचलण्यासाठी निर्मला ऑटो केअर या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहने उलण्यापूर्वी लाऊड स्पीकरवर वाहनचालकांना आवाहन करणे आवश्यक आहे. त्यानंतर नो पार्किंग व वाहतुकीस अडथळा ठरणारी वाहने दूर करण्यासाठी ती उचलून वाहतूक विभाग शाखेकडे नेण्यात येतात.
या नियमाकडे दुर्लक्ष करून तसेच, मोटार वाहन कायद्याचा भंग करून संबंधित एजन्सीमार्फत सर्रासपणे वाहने उचलून नेण्यात येतात. पिंपरी चौक येथील महापालिका भवनासमोरील रस्ता, पिंपरी कॅम्पातील शगुन चौक, वाकडमधील उत्कर्ष चौक, डांगे चौकातील बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी एजन्सीद्वारे नियमांचे उल्लंघन होत आहे. यासंदर्भात वाहनचालकांनी महापालिका, राज्य शासन आणि पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. तरीही एजन्सीच्या कामात काहीच सुधारणा झालेली नाही.
नो पार्किंग व पदपथावर वाहन लावल्यानंतर ते वाहतूक पोलिसांकडून उचलले जाते. वाहन उलण्यापूर्वी लाऊडस्पीकरवर वाहनचालकांना वाहने काढून घेण्याबाबत आवाहन करणे आवश्यक आहे. मात्र, वाहने उचलण्यासाठी नेमलेल्या ठेकेदार एजन्सीकडून या नियमांकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे. एजन्सीच्या टोईंग व्हॅनवर वाहने उचलण्याच्या नियमांचे स्टिकर लावण्यात यावेत, अशी तक्रार विशाल मिठे यांनी केली आहे.
रस्त्यावर व पदपथावर नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास मोटार वाहन चालविण्याचे नियम 2017 (एमव्हीडीआर) चे कलम 22 नुसार अपराध होतो. कारवाई मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 177 अ द्वारे करण्यात येते. रस्त्यावरील रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने पार्क करणार्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा कलम 122/177 अन्वये कारवाई करण्यात येते. अशी वाहने उलचण्याआधी त्या ठिकाणी लाऊडस्पीकरद्वारे अनाउसिंग करणे आवश्यक आहे. त्यानंतर ती वाहने रस्त्यातील अडथळा दूर करण्याचे उद्देशाने टोईंग करून त्या ठिकाणावरून संबंधित वाहतूक विभाग येथे नेण्यात येतात. दुचाकी वाहनचालकाकडून 236 रुपये (जीएसटीसह) आणि चारचाकी वाहनचालकाकडून 472 रुपये (जीएसटीसह) दंड स्वरूपात घेतले जातात. त्याची चालकास पावती दिली जाते.
लाऊडस्पीकरवर आवाहन न करताच थेट नो पार्किंगमधील वाहने उचलून नेली जात आहेत. उचलून नेलेल्या वाहनांच्या चालकांकडून आतापर्यंत तब्बल 80 लाखांचे उत्पन्न महापालिका व पोलिसांना मिळाले आहे. मात्र, नागरिकांची दिशाभूल करून कारवाई करणे योग्य नाही. बेशिस्त वाहनांवरील कारवाईतून त्या एजन्सीला आठ महिन्यांत सुमारे तीन लाखांचा नफा झाला आहे. नफा कमविण्यासाठी एजन्सी नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आरोप नागरिकांनी केला आहे.
टोईंग व्हॅनसोबत असलेले पोलिस अंमलदार व खासगी एजन्सीचे कर्मचार्यांनी वाहनचालकांशी सौजन्याने वागावे. अरेरावीची भाषा वापरू नये. तसेच, नियमानुसार बेशिस्त वाहने उलण्यात यावीत, अशा सूचना त्यांना दिल्या आहेत.
-डी. आर. साळुंके, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक