पुणे: हिर्डोशी धरणग्रस्तांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस, 35 खातेदारांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी

पुणे: हिर्डोशी धरणग्रस्तांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस, 35 खातेदारांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी
Published on
Updated on

भोर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: तब्बल 35 धरणग्रस्तांच्या खातेदारांची तत्कालीन मंत्रिमंडळात जमीन वाटपाची अंमलबजावणी झाली होती. मात्र, ही अंमलबजावणी शासनस्तरावर तातडीने होत नसल्यामुळे अधिकारी, मंत्री यांना काळी शाई फासण्याऐवजी आम्ही स्वत:च्या तोंडाला काळी शाई फासून अधिकारी, मंत्री यांचा जाहीर निषेध करीत आहोत. हे प्रश्न तातडीने सोडवले नाहीत, तर निरा देवघर धरणात आत्मक्लेश करण्याचा इशारा हिर्डोशी (ता. भोर) येथील धरणग्रस्त आंदोलनकर्त्यांनी दिला.

निरा देवघर धरण क्षेत्रातील हिर्डोशी येथील धरणग्रस्तांचा पुनर्वसन प्रश्न गेल्या 17 वर्षांपासून प्रलंबित राहिला आहे. इतका प्रदीर्घ कायदेशीर संघर्ष केल्यानंतरदेखील हिर्डोशी ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा संयम संपल्याने हिर्डोशी ग्रामस्थांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाच दिवस होत असताना देखील याकडे संबंधित अधिकारी, मंत्री याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

सन 2007 पासून प्रशासनातील वेगवेगळ्या स्तरावर तहसीलदार, प्रांताधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, आयुक्त, मंत्रालय, मंत्री, मुख्य सचिव (पुनर्वसन) या सर्वांबरोबर वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये प्रशासनाने आपली चूक मंजूर केली आहे. या 35 खातेदारांना जमीन वाटप होणे आवश्यक असल्याबाबत तोंडी सांगितले आहे. तत्कालीन मंत्री यांनी निर्देश देऊन देखील प्रशासन हा विषय गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे धरणग्रस्तांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून, ही बाब प्रशासनाला लज्जास्पद व धरणग्रस्तांमध्ये चीड निर्माण करणारी आहे. त्यामुळे हिर्डोशी धरणग्रस्तांनी पुणे विभागीय आयुक्त यांना पत्राद्वारे प्रशासनाला स्पष्ट संकेत देत आंदोलन करण्यास शनिवार (दि. 17) पासून सुरुवात केली आहे.

या धरणे आंदोलनाची गांभीर्याने दखल न घेतल्यास सामूहिक आत्महत्येशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरत नसल्याचे धरणग्रस्थांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या आंदोलनाला परिसरातील गावांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

कार्यकारी अभियंत्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष

हिर्डोशी येथील धरणग्रस्थांच्या धरणे आंदोलनास पाच दिवस पूर्ण होत असून, या आंदोलनास भोर तहसीलदार व भोर पोलिस निरीक्षक यांनी भेट दिली. परंतु, निरा देवघरचे कार्यकारी अभियंता किंवा त्यांच्या विभागाने या धरणे आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त
केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news