पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विकास दांगट हे पक्षविरोधी भूमिका घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पॅनलच्या विरोधात काम करत असल्याने पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी मंगळवारी दिली. तसेच इतर कार्यकर्त्यांनीही सुधारणा करावी, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करावी लागेल, असा इशाराही गारटकर यांनी दिला.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खडकवासला शहर अध्यक्ष काका चव्हाण, खडकवासला ग्रामीण अध्यक्ष त्रिबंक मोकाशे, पुरंदर, हवेली तालुका अध्यक्ष भरत झांबरे आदी उपस्थित होते.
गारटकर म्हणाले की, एक वर्षापूर्वी झालेल्या पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रकाश म्हस्के व दांगट यांची मैत्रीपूर्ण लढत झाली होती. दोघेही राष्ट्रवादीचे परंतु, त्याच्यात एकमत होत नसल्याच्या कारणावरुन शेवटच्या क्षणी नाईलाजास्तव हा निर्णय पक्षाला घ्यावा लागला होता. त्या निवडणुकीत पक्षातील अनेकांनी दांगट यांचे उघडपणे काम केले होते. त्यामुळेच ते विजयी झाले होते, याची जाणीव दांगट यांनी ठेवलेली दिसत नाही. १९ वर्षानंतर होत असलेल्या बाजार समिती निवडणुकीमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षाचे अधिकृत पॅनल उभे करण्याचा आदेश दिला होता. त्यांच्या आदेशानुसार मी अनेक वेळा दांगट यांच्याशी पॅनल करण्याविषयी चर्चा केली. परंतु, त्यांनी कायम भाजपच्या काही उमेदवारांसाठी आणि मागील संचालक मंडळात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता, त्यांच्यासाठी ते आग्रही राहिले.
त्यांच्या घरातील सदस्यांना उमेदवारी देण्याची मुभा सुद्धा दांगट यांना दिली होती. तसेच त्यांनाच पॅनल करण्याविषयी पुढाकार घ्यायला सांगितला होता. मात्र, यात वेळ काढूपणाची भूमिका घेतली. शिवाय या निवडणूक प्रक्रियेत पक्षाला गाफिल ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अक्षरश: फसवणूक केल्याचे गारटकर यांनी सांगितले.
पक्षाची शिस्त सर्वांसाठी बंधनकारक आहे. पक्षविरोधी कारवायांबद्दल जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून पीडीसीसी बँकचे संचालक विकास दांगट यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच हवेली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते देखील जे पक्षविरोधी भूमिका घेऊन काम करतात. त्यांना आवाहन करतो, की पक्षविरोधी कारवाया थांबवाव्यात, अन्यथा आपल्यावर देखील कारवाई करावी लागेल, असा इशारा गारटकर यांनी दिला आहे.
हेही वाचा