पुणे शहरात 24 तासात तिसरा खून, मांजरीत महिलेचा खून करून मृतदेह टाकून दिला विहरीत | पुढारी

पुणे शहरात 24 तासात तिसरा खून, मांजरीत महिलेचा खून करून मृतदेह टाकून दिला विहरीत

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कोंढव्यात वृद्धाचा फर्शी डोक्यात घालून, तर खडकीत दुचाकीवर नोकरीस निघालेल्या महिलेवर धारदार चाकूने वार करून खून केल्याची घटना ताजी असतानाच आता मांजरी बुद्रुक येथे महिलेचा धारदार हत्यारांनी खून करत मृतदेह विहरीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 24 तासात शहरात झालेली ही खूनाची तिसरी घटना आहे.

शेतावर काम करणार्‍या महिलेचा धारदार हत्यारांनी खून केला. नंतर मृतदेह मांजरी बुद्रुक येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुरण फार्ममधील विहरीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञातावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उषा अशोक देशमुख (50, रा. माळवाडी, कवडीपाठ, लोणी काळभोर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत स्नेहलता काळभोर (50, रा. मांजरी बुद्रुक, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहलता काळभोर यांचे शेत सांभाळण्याचे काम उषा देशमुख आणि त्यांचे पती गेली बर्‍याच वर्षापासून करतात. सोमवारी (दि. 24) दुपारी अडीच ते सायंकाळी सहाच्या दरम्यान उषा यांचा धारदार हत्यारांनी खून करून त्यांचा मृतदेह मांजरी बुद्रुक येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुरण फार्ममधील विहरीत टाकून देण्यात आला होता. दरम्यान हा मृतदेह उषा यांचे पती अशोक देशमुख यांना दिसल्यानंतर त्यांनी याबाबतची माहीती आपल्या नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी ही माहिती शेतमालक काळभोर यांना दिल्यानंतर स्नेहलता काळभोर यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून नेमका कोणी केल? याचा पोलिस शोध घेत आहेत.

Back to top button