Pitru Paksha increases demand of vegetables
पुणे: पावसाने उघडीप दिल्याने गुलटेकडी मार्केट यार्ड येथील तरकारी विभागात मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची आवक होत आहे. पितृपक्षामुळे नैवेद्यासाठी लागणाऱ्या गवार, भेंडी, तांबडा भोपळा, कारली, काकडी या फळभाज्यांना मागणी वाढली आहे.
आवक-जावक कायम असल्याने या फळभाज्यांचे भाव टिकून आहेत. मात्र, मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरची, गाजर आणि घेवड्याच्या भावात पाच ते दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. (Latest Pune News)
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश हिरवी मिरची 25 ते 30 टेम्पो, इंदोर येथून गाजर 7 ते 8 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 2 ते 3 टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 225 क्रेट, कर्नाटक येथून घेवडा 4 ते 3 5, गुजरात, कर्नाटक येथून भुईमूग 6 ते 7 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 15 ते 16 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 50 ते 55 टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 550 गोणी, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो 10 हजार क्रेटस्, हिरवी मिरची 5 ते 6 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 14 ते 15 टेम्पो, गाजर 5 ते 6 टेम्पो, कोबी 7 ते 8 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, शेवगा 2 टेम्पो, भुईमूग शेंग 60 गोणी, मटार 600 ते 700 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 70 ते 80 ट्रक इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पालेभाज्यांच्या भावात तेजी
पितृपक्षामुळे पालेभाज्याही भाव खाऊ लागल्या आहेत. यामध्ये, सर्वाधिक मागणी मेथी, कोथिंबीर व राजगिराच्या देठाला होत आहे. रविवारी बाजारात कोथिंबिरीची दीड लाख 25 हजार तर मेथीची सत्तार हजार जुडींची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक 25 हजार जुड्यांनी वाढली. तर, मेथीची आवक स्थिर राहिली. घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या एका जुडीची 3 ते 20 रुपये तर किरकोळ बाजारात एका गड्डीची 15 ते 25 रुपये या दराने विक्री सुरू होती.