

वानवडी; पुढारी वृत्तसेवा : 'कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केल्यामुळे आपल्याला विजय मिळाला. हीच एकजूट आगामी महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुकीत दाखविली, तर महाविकास आघाडीची राज्यात सत्ता येईल,' असा विश्वास नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.
वानवडी परिसरातील केदारीनगर येथे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष साहिल केदारी यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभिमुख कार्यक्रम व स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते, त्या वेळी धंगेकर बोलत होते. साहिल केदारी यांच्या कामाचे धंगेकर यांनी कौतुक केले.
शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक शिवाजीराव केदारी, माजी नगरसेविका भावना केदारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अभय छाजेड, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, दत्तोबा जांभुळकर, मारुती जगताप, सुदामराव जांभुळकर, तानाजी लोणकर, साईनाथ बाबर, राजेंद्र बाबर, रवींद्र रसाळ, प्रदीप परदेशी, विजय खळदकर, विशाल मलके, रमेश सोनावणे, महेबूब नदाफा आदी उपस्थित होते.