आळंदी : आळंदी शहरात संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळा तयारीची लगबग सुरू असून, शहरात प्रवेश करणार्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम आळंदी नगरपरिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. चाकण रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले असून आळंदी नगरपरिषदेने देहूफाटा चौकातील खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरू केले आहे.
रस्ते दुरुस्तीबरोबरच दर्शन बारी उभारणी आणि फिरती स्वच्छतागृह, पोलिस नाके उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे गुरुवारी (दि. 19) पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून यानिमित्त लाखो भाविक दिंड्यांसह आळंदीत दाखल होणार आहेत. भाविकांना सोयी सुविधा पुरविण्याकरता प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार अनुषंगिक कामे हाती घेण्यात आली आहेत.
शहरात यादरम्यान 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने नियोजन केले असून टँकरची देखील व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याचे आळंदी येथून गुरुवारी (दि. 19) श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार (दि. 17) पासून शहरात दिंड्या व वारकरी दाखल होण्याची शक्यता असल्याने वारी काळात आळंदी शहरात वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. केवळ दिंड्यांच्या पासधारक वाहनांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. मंगळवार (दि. 17) ते गुरुवार (दि. 19) पर्यंत ही वाहन प्रवेशबंदी असणार आहे. या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन आळंदी पोलिसांनी केले आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्ग म्हणून शिक्रापूर महामार्गे चाकण, वडगाव घेनंद, कोयाळी, मरकळ तसेच नगर महामार्गे लोणीकंद फाटा, तुळापूर, मरकळ, आळंदी व चर्होली बुद्रुक फाटा ते चर्होली खुर्द अशा जोडरस्त्यांचा वापर करता येणार आहे.
पुण्यावरून येणार्या वाहनांना चर्होली फाटा - मोशी मार्गे-चाकण असा पर्यायी मार्ग असणार आहे. गुरुवारी (दि. 19) पालखी प्रस्थान झाल्यानंतर शुक्रवारी (दि. 20) सकाळी सहाच्या सुमारास पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. यानंतर आळंदी शहरातील वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.