

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनमालकांना वाहन नोंदणी पुस्तक (आरसी बुक) वेळेत मिळत नसल्याने वाहनमालक त्रस्त झाले आहेत. दोन- दोन महिने आरसी बुक मिळत नसल्याने अनेकांची कर्जप्रकरणे अडकून पडली आहेत. अधिकारी मात्र दुर्लक्ष करत आहेत. सुरुवातीला देण्यात येणारी आरसी पुस्तके आता बंद झाली आहेत. डिजीटल स्मार्ट कार्ड देण्यात येतात. मात्र, स्मार्ट कार्ड संबंधित मालकांपर्यंत पोचण्यास तब्बल दोन महिने जात आहेत.
तंत्रज्ञानामुळे लिखाणाचे काम उरले नाही. संबंधित स्मार्ट कार्डसाठी खासगी एजन्सी नेमली आहे. आरटीओ विभाग वाहनमालकांना वेळेत सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे. नियमानुसार 45 दिवसांत आरसी बुक संबंधित वाहनमालकाला मिळणे गरजेचे आहे. मात्र, अधिकारी आणि कर्मचा-यांच्या असहकार्यामुळे वाहनचालकांवर पश्चात्तापाची वेळ आली आहे. एजंटाकडूनच सर्व कामे होत असल्याने आणि एजंटांचा विळखा या कार्यालयाला पडल्याने आरटीओ कार्यालय हे सर्वसामान्यांसाठी नाही असेच येथील चित्र आहे.
वाहने पासिंगसाठी मेडद येथे ट्रॅक बनवला आहे. मात्र, ट्रॅकवर दिवसभरात 40 वाहनेच पासिंग होतात. बारामती, दौंड आणि इंदापूर या तीन तालुक्यांत वाहनमालक याठिकाणी आपापली वाहने घेऊन पासिंगसाठी येतात. मात्र, दिवसात फक्त 40 वाहने पासिंग होत असल्याने दिवसभरात किमान 100 वाहने पासिंग करावीत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. तिन्ही तालुक्यांत लाखो वाहनांची संख्या असूनही वाहन पासिंग कमी होत असल्याने पासिंगसाठी वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ वाहनचालकांवर येते. कर्मचारी वेळेवर काम करत नसल्याच्या तक्रारीही नागरिक करत आहेत.
सेवा-सुविधा देण्यात कार्यालय असमर्थ
तिन्ही तालुक्यातींल नागरिकांची सोय होण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामती येथे राज्यातील अत्याधुनिक आरटीओ कार्यालय उभारले. मात्र, हे कार्यालय सर्वसामान्यांना सेवा-सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे. सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी अधिकार्यांनी कामकाजात बदल करावा, अशी मागणी वाहनमालक करत आहेत.