

पुणे: परिवहन विभागाने आता वाहन कर्जबोजा रद्द करण्याची प्रक्रिया पूर्णपणे फेसलस म्हणजेच कागदपत्र विरहित आणि ऑनलाइन केली आहे. या नव्या सेवेमुळे नागरिकांना आता प्रादेशिक परिवहन कार्यालयात चकरा मारण्याची गरज लागणार नाही, त्यामुळे त्यांचा वेळ वाचणार आहे.
केंद्र सरकारच्या 16 सप्टेंबर 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार, आधार क्रमांकाचा वापर करून 58 सेवा फेसलेस पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याच अंतर्गत, वाहन कर्जबोजा रद्द करणे ही सेवा देखील समाविष्ट करण्यात आली आहे. राष्ट्रीय सूचना केंद्राने (एनआयसी) आधार क्रमांकाच्या आधारे ही सेवा सुरू केली आहे. यामुळे प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक झाली आहे. (Latest Pune News)
बँकांसाठी महत्त्वाची सूचना
सध्या, सुमारे 35 ते 40 बँका वाहन प्रणालीशी जोडल्या गेल्या आहेत आणि या सेवेचा लाभ घेत आहेत. ज्या बँकांची अद्याप वाहन प्रणालीशी जोडणी झालेली नाही, त्यांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी sonar.deepak@nic. in या ई-मेल आयडीवर संपर्क साधून पुढील कार्यवाही करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी केले आहे.
कशी काम करेल ही नवीन सेवा ?
ऑनलाइन अर्ज :- अर्जदाराला वाहन प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करताना आपला आधार क्रमांक नोंदवावा लागेल.
ओटीपी पडताळणी :- आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर वाहन मालकाचे नाव आणि कार्यालयीन नोंदीमधील नाव याची पडताळणी केली जाईल.
बँकेमार्फत माहिती :- त्यानंतर, संबंधित बँक थेट वाहन प्रणालीवर वाहनावरील कर्जबोजा रद्द झाल्याची माहिती पाठवेल.
कागदपत्र अपलोड :- अर्जदाराला नमुना 35 (फॉर्म 35) आणि इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतील.
कार्यालयात येण्याची गरज नाही :- आधार क्रमांकाचा वापर करून अर्ज केल्यास अर्जदाराला मूळ नोंदणी प्रमाणपत्र किंवा इतर कोणतीही कागदपत्रे कार्यालयात जमा करण्यासाठी येण्याची आवश्यकता नाही.
या सुविधेमुळे नागरिकांना कार्यालयात ये-जा करण्याचा त्रास वाचेल आणि संपूर्ण प्रक्रिया घरबसल्या किंवा कोणत्याही ठिकाणाहून पूर्ण करता येईल.