पिंपरी : मायक्रोचीपअभावी रखडले वाहन परवाने; 21 हजारांहून अधिक नागरिक प्रतीक्षेत

पिंपरी : मायक्रोचीपअभावी रखडले वाहन परवाने; 21 हजारांहून अधिक नागरिक प्रतीक्षेत
Published on
Updated on

राहुल हातोले
पिंपरी : शहरात मे महिन्यापासून वाहन परवान्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहन परवान्याचे 'स्मार्ट कार्ड' तयार करताना त्याला मायक्रोचीप लावली जाते. ही मायक्रोचीप बनविण्याचे साहित्य युक्रेन-रशिया या देशातून येते. सद्या या दोन देशात युद्ध सुरू असल्याने या साहित्याचा तुटवडा भासत आहे. परिणामी शहरातील सुमारे 21 हजारांहून अधिक वाहन परवाने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून वितरीत करण्यात आलेले नाहीत.

या आहेत प्रातिनिधीक स्वरूपातील दोन घटना

दोन महिन्यांपूर्वी चारचाकी वाहनांच्या परवान्यासाठी आमची चाचणी झाली होती. चाचणीनंतर दहा दिवसांत घरपोच परवाना मिळणार असे सांगण्यात आले होते. स्पीड पोस्टसाठी पन्नास रुपयेदेखील भरलेले आहेत. मात्र 60 दिवस उलटूनही अद्यापपर्यंत परवाना मिळालेला नाही. आरटीओ कार्यालयात माहितीसाठी विचारणा केल्यानंतर मायक्रोचीपचा तुटवडा असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. मात्र, आणखी किती दिवस हा तुटवडा जाणवणार आहे? यावर उपाय केव्हा शोधणार आहेत, हा प्रश्न पडतोय.

                                                                    – एक, नागरिक, चिंचवड.

अडीच महिन्यांपासून वाहन परवान्याची वाट पाहतोय. अद्यापही मला परवाना मिळालेला नाही. पुणे शहरात कामानिमित्त गेलो असताना, वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहन अडवले. मी त्यांना परवान्याबाबत संपूर्ण प्रकार सांगितला. त्यांना ऑनलाईन परवाना मंजूर झाल्याची माहिती दिली; मात्र पोलिसांनी दंड आकारलाच. यामध्ये आमची चूक काय? परवाना अजूनही मिळाला नसल्याने आम्हाला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
                                                                  – एक, नागरिक, निगडी.

याविषयी उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना विचारले असता, आता ही समस्या मिटली असून, नागरिकांना लवकरच घरपोच वाहन परवाने मिळतील अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी देत आहेत; परंतु संबंधितांशी संपर्क साधला असता. त्यांना दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरीही वाहन परवाना घरपोच मिळाला नसल्याच्या तक्रारी सुरूच आहेत.

नागरिकांमधील चर्चा
मायक्रोचीप पुरविणार्‍या कंपनीचा करार संपला असून, त्यावर अद्यापपर्यंत तोडगा निघाला नसल्याने नागरिकांना नाहक हा त्रास सहन करावा लागत आहे, अशी चर्चा माहितगारांनी नागरिकांना दिल्याने नागरिकांमध्ये कुजबूज आहे.

काय आहेत नियम..
नियमानुसार एकूण 45 दिवसांत वाहन परवाना नागरिकांना घरपोच मिळायला हवा, असा नियम आहे. यापूर्वी या नियमांची अंमलबजावणीदेखील केली जात होती.

नागरिकांच्या वाहन परवान्याचा प्रश्न आता संपलेला आहे. पूर्वीप्रमाणेच वाहन परवाने नागरिकांना लवकरच घरपोच मिळतील.
                                                        – अतुल आदे,                                                                                      उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिं.चिं.शहर.

मे महिन्यापासून 40 हजारांहून अधिक नागरिकांचे वाहतूक परवाने बाकी होते. ऑगस्ट महिन्यात 10 हजारहून अधिक परवाने पुरविण्यात आले. मात्र, मागील अर्जाचा विचार करून परवाने देण्यात आले. परंतु, रोज नव्याने परवान्यासाठी अर्ज करणार्‍या नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
                                                         – सुनील बर्गे,
                                             मोटार ड्रायव्हिंग स्कूल अध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news