पारगाव; पुढारी वृत्तसेवा : उन्हाचा तडाखा, त्यात मध्यंतरी पडलेल्या अवकाळी पावसामुळे पालेभाज्या तसेच फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, सध्या पालेभाज्या व फळभाज्यांचे दर कडाडले आहेत. पारगाव (ता. आंबेगाव) येथे दर शुक्रवारी भरणार्या आठवडे बाजारात पालेभाज्या व फळभाज्यांचे दर कडाडल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, आले व लिंबांच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे.
एक महिन्यापूर्वी सर्वत्र अवकाळी पाऊस पडला, नंतर सतत ढगाळ हवामान व आता वाढलेला उन्हाचा तडाखा, याचा परिणाम शेतीपिकांवर झाला आहे. शेतातील फळभाज्या व पालेभाज्या पाण्याअभावी जळून गेल्या आहेत, तर अवकाळी पावसाने देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता बाजारभावावर परिणाम झाला आहे. पारगावच्या आठवडे बाजारात प्रत्येक पालेभाजी आणि फळभाजीच्या दरात सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले.
आले व लिंबाचे दर गगनाला
सध्या आले आणि लिंबाचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत. 120 रुपये किलो दराने लिंबू विक्री सुरू होती. यामुळे ग्राहकांनी लिंबाच्या खरेदीकडे पाठ फिरवली. आल्याचे भाव देखील कडाडले आहेत. आले 100 रुपये किलो दराने ग्राहक खरेदी करीत होते.
पालेभाज्या, फळभाज्यांचे दर (प्रतिकिला)
भेंडी – 60, शेवगा – 40, फरशी – 60 ते 80, मिरची – 80, कारले – 60, टोमॅटो – 30, गाजर – 30 ते 40, ढोबळी – 60, काकडी – 30, गवार – 100 ते 120, वाटाणा – 100, वांगी – 30
यंदा पालेभाज्या व फळभाज्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणीटंचाईचा देखील शेतमालांना फटका बसल्याने किमतीत वाढ झाली. यापुढील दिवसांमध्येही पालेभाज्या व फळभाज्यांच्या किमतीत वाढ होईल.
– शरद मेहेत्रे, पालेभाज्या-फळभाज्या विक्रेते, शिंगवे