भाजी विक्रेत्या महिलेस कमांडोंकडून मारहाण; विविध राजकीय पक्षांकडून घटनेचा निषेध

भाजी विक्रेत्या महिलेस कमांडोंकडून मारहाण; विविध राजकीय पक्षांकडून घटनेचा निषेध
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दापोडी येथे अतिक्रमण विरोधी कारवाई करताना एका भाजी विक्रेत्या महिलेस महापालिकेच्या पथकातील एमएसएफ कमांडोंनी मारहाण केली. त्या घटनेचा शहरातील विविध सामाजिक संघटना, संस्था आणि राजकीय पक्षांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाकडून आपल्या हद्दीतील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाते. दापोडी परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे काम शुक्रवारी (दि.14) ह क्षेत्रीय कार्यालयाचे पथक करीत होते. भाजी विक्री करणार्‍या रेश्मा श्रावण कांबळे या महिलेस पथकातील एमएसएफच्या कंमाडोंनी मारहाण केली. हातगाडीवरील भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला. या अमानवी घटनेचा विविध संघटना, संस्था आणि राजकीय पक्षांकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. त्या भाजीपाला व हातगाडीचे नुकसान झाले.

महापालिकेने केलेली कारवाई निषेधार्ह आहे. असे असताना महापालिकेने संबंधित भाजी विक्रेत्या महिला आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलांवर भोसरी पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा नोंदविला आहे. कारवाईचा निषेध करण्यासाठी तसेच, गुन्हा मागे घ्यावा, मारहाण करणार्‍या कमांडोंवर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व भाजीपाला व्यापारी कृती समितीच्या शिष्टमंडळाकडून महापालिकेचे उपायुक्त मनोज लोणकर यांना मंगळवारी (दि.18) देण्यात आले. या वेळी माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, उषा काटे तसेच, सिकंदर सूर्यवंशी, आप्पा गायकवाड, दीपक सावळे, अजय ठोंबरे, अनिल गजभिय, सुरेश बोर्डे, रवींद्र कांबळे, नंदू कांबळे, ओमपाल सोनिया, मेहबूब शेख, दीपक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते व भाजी विक्रेते उपस्थित होते. यासंदर्भात भोसरी पोलिस ठाण्यातही निवेदन देण्यात आले.

पथकातील महिलांवर फौजदारी गुन्हा दाखल करा

भाजी विक्रेत्या महिलेला अमानुषपणे मारहाण करणार्‍या भरारी पथकातील कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. भ्रष्ट अधिकारी व पुढार्‍यांच्या ईशार्‍यावर कारवाई करण्याचा स्टंट करतात. धनदांडग्यांचे व्यावसायिक अतिक्रमणे सोयीस्करपणे दुर्लक्षित करून पोटाची खळगी भरण्यासाठी हातगाडी व पथारी लावून चरितार्थ चालवणार्‍या गोरगरिबांवर कारवाई करून त्यांच्या मालाची नासाडी करतात. प्रशासकीय राजवटीत शहरात पार्किंगची व वाहतुकीची गंभीर समस्या आहे.

पुणे-मुंबई जुन्या महामार्ग व शहरातील अनेक भागात व्यावसायिक इमारतींमध्ये पार्किंग क्षेत्रात बेकायदेशीर हॉटेल्स आणि इतर आस्थापना राजरोसपणे सुरू आहेत. या पथकाने अशा किती हॉटेलवर व बेकायदेशीर आस्थापनांवर कारवाई केली? हा संशोधनाचा भाग आहे. धनदांडग्या व्यावसायिकांना व विकसकांना पाठीशी घालून गोरगरीब जनतेवर अतिक्रमण कारवाईचा बडगा उगारणार्‍या प्रशासनाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख माजी नगरसेवक अ‍ॅड. सचिन भोसले यांनी निषेध केला आहे.

कायदा विभागाचा सल्ला घेऊ

'ह' क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाकडून ती कारवाई करण्यात आली. कायदा विभागाच्या सल्ला घेऊन पुढील कारवाई केली जाईल, असे महापालिकेचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news