

खोर : पुढारी वृत्तसेवा : वरवंड येथील ब्रिटिशकालीन व्हिक्टोरिया तलाव हा दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरीवर्गाच्या अर्थकारणाला चालना देणारा व दुष्काळाच्या कालावधीत वरदान ठरणारा आहे. या तलावातील गाळ आजतागायत काढला गेलेला नाही. गाळामुळे या तलावात सध्या केवळ 26 टक्के पाणीसाठा असून, राज्य शासनाने गाळमुक्त तलाव अभियान हाती घेऊन या तलावातील गाळ काढण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
या तलावात मोठ्या प्रमाणात वाढत असलेला गाळसाठा पाहता तलावाची पाणी साठवणक्षमता कमी पडू लागली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत लवकरच पाणीसाठा संपुष्टात येऊन हा तलाव आटत आहे. या वर्षी उन्हाळ्यात या तलावात केवळ 12 टक्के पाणीसाठा उरला होता. मात्र, आता आवर्तन सुरू असल्याने 26 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळेच राज्य शासनाने गाळमुक्त तलाव हे धोरण हाती घेऊन याची अंमलबजावणी करणे काळाची गरज बनली गेली आहे.
तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले गेले, तर निश्चितच या तलावाला पुनर्जीवन मिळणार असून, पाणी साठवणक्षमतेत भरमसाट वाढ होणार आहे. याचा फायदा म्हणजे उन्हाळ्याच्या कालावधीत या तलावातील पाणी लवकर संपुष्टात येणार नाही आणि शेतकरीवर्गाच्या पिकाला उन्हाळ्याच्या कालावधीत पाण्याची कमतरता भासणार नाही.
या तलावातून दौंड तालुक्यातील पाटस, कुसेगाव, खोर, पडवी, वरवंड, कडेठाण, देऊळगाव गाडा, कानगाव या 8 गावांना पाणी दिले जाते. सद्य:स्थितीत पाटस, गिरीम हद्दीतील तसेच भिगवण शाखा कालव्याचे सिंचन व्यवस्थापन सुरू आहे. वरवंडच्या पुढील भागातील सिंचन पूर्ण होत आलेले असून, वरवंड तलावात सोडण्यात येणारे पाणी टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येत आहे.
– राहुल वर्हाडे, जलसंपदा शाखा अधिकारी, खडकवासला पाटबंधारे विभाग, वरवंड
310 एकरांमध्ये विस्तार
खडकवासला धरणसाखळीतून खरीप, रब्बी व उन्हाळी या तीन आवर्तनांसाठी दौंड तालुक्याला 11.08 टीएमसी पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. मुठा उजवा कालव्यातून वरवंड येथील तलाव भरण्यात येत आहे. जवळपास 310 एकरांत विस्तार असलेल्या या तलावाची साठवणक्षमता 200 दशलक्ष घनफूट आहे. या तलावाच्या माध्यमातून कुरकुंभ औद्योगिक वसाहत, वायनरी प्रकल्प, जनाई-शिरसाई योजना व दौंड तालुक्यातील इतर गावांबरोबरच बारामती तालुक्याला देखील पाणी पुरविण्यात आले आहे.