Varvand murder case updates
खोर: वरवंड (ता. दौंड) हद्दीत एका 33 वर्षीय युवकाचा विटा व सिमेंटच्या मिक्सरच्या तुकड्याने डोक्यावर प्राणघातक वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन दिवसांत तपासाचा छडा लावून दोन आरोपींना अटक केली आहे.
वरवंड (ता. दौंड) परिसरातील पुणे- सोलापूर हायवेलगत असलेल्या पडीक जमिनीत शैलेंद्रकुमार सुशीलकुमार विमल (वय 33, मूळगाव- जमोहना, ता. भानपूर बाबु, जि. बस्ती, उत्तर प्रदेश; सध्या रा. वरवंड वरसगाव) यांचा मृतदेह आढळला. अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरून त्यांच्या डोक्यात विटा व सिमेंटच्या मिक्सरचा तुकडा मारून खून केला होता. (Latest Pune News)
ही घटना मंगळवारी (दि. 5) सायंकाळी साडेपाच वाजता घडली होती. ही घटना बुधवारी (दि. 6) सकाळी पावणेआठच्या सुमारास उघडकीस आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर यवत पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा व गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही तपासणी केली.
त्यातून विनोद ऊर्फ नंदू दत्तात्रय रणधीर (रा. वरवंड) आणि गणेश ऊर्फ अक्षय तानाजी उमाटे (रा. कानिफनाथनगर, वरवंड; मूळ रा. तेर ढोकी, जि. धाराशिव) यांनी संगनमत करून हा खून केल्याचे समोर आले. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे, महेश माने, पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक भोसले, संजय जगदाळे, सहायक फौजदार महेंद्र फणसे आणि इतर कर्मचार्यांचा सहभाग होता. दोन्ही आरोपींना अटक करून त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. जी. शेख करत आहेत.
जाता- जाता लावला खुनाचा छडा
पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख यांची बदली होऊन पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. मात्र, घडल्या खुनाच्या घटनेच्या संदर्भातील छडा लावण्याचे काम शेख यांच्यावर सोपविण्यात आले होते. शेख यांनी अवघ्या दोन दिवसात जाता - जाता आरोपींना जेरबंद केल्याने परिसरातून चांगले काम करणारा अधिकारी तालुक्यातून निरोप घेत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.