

नारायणगाव: बेल्हे (ता. जुन्नर) येथील जमिनीच्या 7/12 उतार्यात छेडछाड करून नारायणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची विक्री केल्याप्रकरणी दुय्यम निबंधक अर्चना शैलेंद्र पाकळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना जुन्नर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
याप्रकरणी जमिनीची विक्री करणारे विमल मुरलीधर विश्वासराव (वय 84), रंजना शंकर गोरे (वय 46, दोघीही रा. कुंभार आळी, पाबळ, ता. शिरूर), जयश्री अनिल सोलवंकर (वय 42, रा. श्रीकृष्ण कॉलनी, थेरगाव, डांगे चौक, चिंचवड), सतीश यशवंत कुंभार (वय 38), संतोष यशवंत कुंभार (वय 40, दोघेही रा. सदाशिव पेठ, कुंभारवाडा, पूना हॉस्पिटलजवळ, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातील संतोष कुंभार व सतीश कुंभार यांना पोलिसांनी अटक केली. (Latest Pune News)
बेल्हे येथील सामाईक खाते क्रमांक 373 मधील 115/1 या गटाचे खरेदीदस्त बनविल्यानंतर हस्तलिखित 7/12 व संगणकीकृत 7/12 यांच्या पीक पाहणीत तफावत असल्याचे तपासणीत दिसून आले. खरेदीखत झाल्यानंतर याप्रकरणी जमिनीचे सहखातेदार सुनील लक्ष्मण विश्वासराव यांनी बेल्हे येथील ग्राम महसूल अधिकारी, उपविभागीय अधिकारी, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, दुय्यम निबंधक नारायणगाव यांच्याकडे तक्रार केली.
ग्राम महसूल अधिकार्यांनी यासंबंधित दिलेला अहवाल पाहून खरेदीखतास जोडलेल्या सातबार्याची पडताळणी दुय्यम निबंधक अर्चना पाकळे यांनी केली. त्यात विश्वासराव यांच्या तक्रारीत तथ्य दिसून आले. यामुळे दुय्यम निबंधक पाकळे यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.