

पुणे: मुंबईतील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी वर्षा लड्डा-उंटवाल यांची शासनाने येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या सदस्य सचिवपदी (महासंचालक) नियुक्ती केली असून तसे बदलीचे आदेश मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही.राधा यांनी 2 जुलै रोजी दिले आहेत. दरम्यान, लड्डा यांनी आपल्या पदाचा पदभार गुरुवारी (दि.3) स्विकारला आहे.
कृषी परिषदेचे यापुर्वीचे महासंचालक रावसाहेब भागडे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या पदाचा अतिरिक्त पदभार कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे देण्यात आला होता. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांसाठी कृषी परिषदेचे काम महत्वपूर्ण असून आता शासनाने महासंचालकपदी पूर्णवेळ अधिकारी दिल्यामुळे कामास गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
लड्डा-उंटवाल यांची 1998 मध्ये उपजिल्हाधिकारी पदी निवड होऊन सर्वप्रथम सिंधुदुर्ग येथे नियुक्ती झाली होती. त्यानंतर विविध पदांवर काम केले. पुणे विभागीय आयुक्तालयात सहाय्यक आयुक्त मागास वर्ग कक्ष विभाग, प्रकल्प संचालक-बार्टी पुणे, पुणे विभागीय आयुक्तालयात अपर आयुक्त- सामान्य प्रशासन आदींचा समावेश आहे.