पिंपरी : आयटी कंपन्यांमध्ये ‘व्हेरिएबल पे’ला कात्री

पिंपरी : आयटी कंपन्यांमध्ये ‘व्हेरिएबल पे’ला कात्री

पिंपरी : शहर परिसरातील काही आयटी कंपन्यांमध्ये सध्या वर्क फ—ॉम होम चालू आहे. तर, काही कंपन्यांमध्ये हायब—ीड मॉडेलचा स्वीकार करण्यात आला आहे. दरम्यान, मोठ्या कंपन्यांचे प्रोजेक्ट कमी झाल्याने काही कंपन्यांनी कामगार कपात केली. तर, काही कंपन्यांनी कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये कपात केली आहे. या पार्श्वभूमीवर काही कंपन्यांनी कर्मचार्‍यांच्या परिवर्तनीय वेतनाला (व्हेरिएबल पे) देखील कात्री लावली आहे.

व्हेरिएबल पे म्हणजे काय?
कोणताही कर्मचारी कामावर घेताना त्याला ठराविक रकमेचे पॅकेज दिले जाते. त्याला कॉस्ट टू कंपनी (सीटीसी) म्हणतात. समजा ही रक्कम 10 लाख रुपये एवढी ठरली असेल, तर त्यातील सुमारे आठ लाख रुपये (कंपनीनुसार रक्कम वेगळी असू शकते) निश्चित पगार म्हणून दिले जातात. तर उर्वरित रक्कम ही व्हेरिएबल पे नुसार दिली जाते. कंपनीच्या आर्थिक ताळेबंदानुसार वर्षाकाठी झालेला फायदा-तोटा, कर्मचार्‍यांच्या टीमने एकत्रितरित्या केलेले काम तपासून व्हेरिएबल पे दिला जातो.

काय आहे नेमकी स्थिती?
व्हेरिएबल पे कंपनीनिहाय देण्याचे प्रमाण वेगवेगळे आहे. काही कंपन्यांमध्ये केवळ 5 ते 10 टक्क्यांपर्यंतच ही रक्कम दिली जाते. तर, काही कंपन्यांमध्ये 5 टक्क्यांपासून 30 टक्क्यांपर्यंतदेखील पे दिला जातो. कंपन्यांनी व्हेरिएबल पेची रक्कम कमी केल्याने त्याचा सर्वाधिक फटका सी 2 ग्रेडच्या कर्मचार्‍यांना बसत आहे. कंपनीचे कामकाज, टीमकडे सोपविलेले काम आणि त्या टीममध्ये कार्यरत कर्मचार्‍यांनी एकत्रितपणे केलेली कामगिरी यांचे मूल्यमापन करून पे ठरविण्यात येतो. त्यातील कंपनीचे कामकाज म्हणजे कंपनीला किती फायदा झाला, याचा विचार करून व्हेरिएबल पे किती द्यायचे हे ठरविले जाते. त्यानंतर टीम व कर्मचार्‍याच्या कामकाजाच्या प्रगतीचा विचार केला जातो.

नियम नसल्याने अडचण
आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये व्हेरिएबल पे किती दिला जावा, याबाबत कोणतेही नियम नाहीत. कोरोनानंतर निर्माण झालेली आर्थिक स्थिती, रशिया-युक्रेन युद्ध यामुळे विदेशातून देशात येणार्‍या प्रोजेक्टची संख्या कमी झाली. त्यामुळे खर्चात कपात करण्यासाठी आयटी कंपन्यांनी नवनवीन युक्त्या शोधल्या होत्या. त्यामध्ये आयटीयन्सचा व्हेरिएबल पे 10 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी केला होता.

नफ्यात कपात झाल्यास परिणाम…
कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले नसतील, कंपन्या देत असलेल्या सेवेला मागणी घटली असेल तर आपोआपच त्याचा परिणाम कर्मचार्‍यांच्या व्हेरिएबल पेवर देखील पाहण्यास मिळतो. कंपन्यांच्या नफ्यामध्ये 10 टक्के जरी कपात झाली तरी व्हेरिएबल पेला कात्री लावण्यात येते. एखाद्या प्रोजेक्टमध्ये तोटा झाल्यास लगेचच पेमध्ये कपात करणे किंवा त्याला कात्री लावणे योग्य नसल्याचे आयटीयन्सचे म्हणणे आहे.

आमच्या कंपनीमध्ये दरवर्षी कंपनीच्या नफ्यानुसार 20 ते 30 टक्क्यांपर्यंत व्हेरिएबल पे दिला जात होता; मात्र आता कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाल्याचे कारण देत व्हेरिएबल पे वार्षिक केवळ 5 ते 10 टक्क्यांपर्यंतच दिला जात आहे.
                                                                 – राहुल, आयटी अभियंता.

आमच्या कंपनीत व्हेरिएबल पे मिळतो. हा पे वार्षिक स्वरुपात मिळतो. त्याऐवजी तो तिमाही किंवा दर महिन्याला मिळायला हवा.
                                             – आनंद कांकरिया, आयटी अभियंता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news