

टाकळी भीमा: कधीकाळी शेतकर्यांच्या घरासमोर उभी असलेली बैलगाडी आणि तिची बैलजोडी हे ग्रामीण जीवनाचे अविभाज्य अंग होते. मात्र, यांत्रिकीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे शेतकर्यांच्या दारासमोरील ही पारंपरिक बैलगाडी आता नामशेष होत चालली आहे.
पूर्वी प्रत्येक शेतकर्याकडे किमान एकतरी बैलजोडी असायची. नांगरणी, पेरणी, कोळपणी, मळणी, ऊसफोडणी, बांधणी आदी सर्व कामे बैलांच्या साहाय्याने केली जात. या प्रक्रियेत ‘सावड’ हा शब्द विशेषतः बैलांच्या श्रमांवर आधारित सामूहिक शेतीकामासाठी वापरला जात असे. बैल म्हणजे केवळ शेतीसाठी उपयोगी जनावर नव्हते, तर ते शेतकर्याच्या घराचे वैभव मानले जात होते.
परंतु, कालानुरूप बदल घडत गेले. यांत्रिकीकरणाच्या झपाट्याने शेतात ट्रॅक्टर, मळणी यंत्रांचा वापर वाढू लागला. त्यामुळे शेतकर्यांनी बैल पाळणे बंद केले. कष्टाची कामे आणि वाढत्या खर्चामुळे बैलजोडीचा उपयोग कमी झाला आणि हळूहळू त्या नजरेआड जाऊ लागल्या. (Latest Pune News)
आज शिरूर तालुक्यात अनेक गावे अशी आहेत, की जिथे पूर्वी अंगणात उभी असलेली बैलगाडी आता फक्त आठवणींच्या पटलावरच उरली आहे. अगदी बैलपोळ्यासारख्या पारंपरिक सणालाही काही घरांत बैलजोडीच उरलेली नाही.
जनावरांच्या बाजारात आजही देखण्या बैलजोड्या विक्रीस येत असल्या, तरी मागणी कमी होत चालल्यामुळे त्यांची संख्या घटताना दिसते. एकेकाळी लाखो रुपयांची उलाढाल करणार्या बैलबाजारालाही मरगळ आली आहे. ग्रामीण भागातील ही स्थिती पाहता असे म्हणावेसे वाटते की, तंत्रज्ञानाच्या सोयीसाठी आपण आपल्या परंपरा, श्रमशीलता आणि शेतीशी असलेले जिवाभावाचे नाते गमावत चाललो आहोत.