

पुणे : इमारतीवर दगड मारल्याचा जाब विचारला म्हणून एका व्यक्तीच्या अंगावर कुत्रा सोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कुत्र्याने घेतलेल्या चाव्यात संबंधित व्यक्ती जखमी झाली आहे. सुभाष चंद्रकांत कदम (वय 37, रा. टाईप डी क्वार्टर, रेंजहिल्स, खडकी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खडकी पोलिसांनी जोसेफ आरुलदास मोसस (वय 47, रा. डी टाईप, रेंजहिल्स, खडकी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रविवारी (दि. 26) सकाळी साडेआठच्या सुमारास रेंजहिल्स खडकी येथील टाईप डी क्वार्टर येथे ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कदम आणि आरोपी जोसेफ हे दोघे एकाच परिसरात वास्तव्यास आहेत. जोसेफ हा इमारतीला दगड मारत होता. त्याचा जाब कदम यांनी विचारला. दगड मारू नको, गाडीला लागेल, असे सांगून कदम इमारतीतून खाली आले. त्या वेळी कदम आणि जोसेफ यांच्यात वाद झाला. त्यावेळी जोसेफने त्याच्याकडील पाळीव कुत्रा कदम यांच्या अंगावर सोडला. त्याने कदम यांच्या डाव्या पायाच्या पोटरीचा चावा घेऊन त्यांना जखमी केले. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर कदम यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी जोसेफ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.