

वाल्हे; पुढारी वृत्तसेवा : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरून वाल्हे (ता. पुरंदर) गावामधून श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर तसेच घोडेउड्डाण मंदिर, हरणी येथील महादेव मंदिर आदी गावांना जोडणारा वाल्हे ते हरणी हा रस्ता मागील 25 वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. अखेर या वर्षी या रस्त्याचे नशीब उघडले असून, जिल्हा परिषदेतून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून या रस्त्याची पुनर्बांधणी केली जात आहे. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. हे निकृष्ट काम सुधारावे; अन्यथा या रस्त्यावरच उपोषण करण्याचा इशारा हरणी ग्रामस्थांनी दिला आहे.
फेब—ुवारी महिन्यात राख (ता. पुरंदर) येथे राख ते हरणी-राऊतवाडी फाटा या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. दरम्यान, मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्यानंतर वाल्हे, हरणी, वीर, परिंचे आदी मोठ्या गावांना जोडणार्या रस्त्याला मिळाल्याने येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र, मागील काही महिन्यांपूर्वी वाल्हे-मांडकी-हरणी या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामावर ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
दोन टप्प्यांमध्ये दोन ठेकेदारांमार्फत होत असलेल्या या रस्त्याचे काम वाल्हे बाजूने निकृष्ट दर्जाचे, तर दुसर्या राऊतवाडी बाजूने चांगल्या दर्जाचे काम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कामाबाबत ठेकेदार पी. टी. कदम यांच्याशी सतत संपर्क साधत चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित ठेकेदार उडवाउडवीची उत्तरे देत प्रत्यक्ष कामावर येण्याचे टाळत असल्याचे सरपंच धनंजय यादव यांनी सांगितले. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुभाष चौरे यांच्याशी संपर्क साधला असता ते देखील या कामावर पाहणी करण्यासाठी अद्याप आलेच नाहीत.
त्यामुळे या रस्त्यावर उपोषण करणार असल्याचा संतप्त इशारा विजय यादव यांसह ग्रामस्थांनी दिला आहे. या वेळी सरपंच धनंजय यादव, विजय यादव, अमोल यादव, संतोष यादव, शंकर यादव, शिवाजी यादव, ओंकार यादव, जालिंदर यादव, हरिश्चंद्र यादव, नानासाहेब यादव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, ग्रामस्थांनी दिलेल्या उपोषणाच्या इशार्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुभाष चौरे यांनी ठेकेदारासह भेट दिली. या वेळी त्यांनी नियमानुसार काम करण्याचे आश्वासन दिल्याचे सरपंच धनंजय यादव यांनी सांगितले.