वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राला रिक्त पदाचे ग्रहण; पदे भरण्याची मागणी

वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राला रिक्त पदाचे ग्रहण; पदे भरण्याची मागणी
Published on
Updated on

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा: वाल्हे (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील अनेक महिन्यांपासून अपुरा कर्मचारीवर्ग असल्याने आरोग्यसेवा मिळण्यात अडथळे येत आहेत. त्यातच संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सद्यःस्थितीत वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांना रिक्त कर्मचार्‍यांचा भार सांभाळावा लागत आहे.

मागील अनेक महिन्यांपासून आरोग्य केंद्रातील पदे, बदली, सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती, शिक्षण, वैद्यकीय आदी कारणांमुळे पदे रिक्त आहेत. यामुळे रुग्णांना सेवा पुरविण्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. रुग्णांना सेवा देताना उपस्थित कर्मचारीवर्गाला कसरत करावी लागत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला तसेच उपकेंद्रांना कायमस्वरूपी कर्मचारीवर्ग देण्यात यावा. आरोग्य केंद्राच्या इमारतीची, कर्मचारीवर्गाच्या निवासाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली आहे. परंतु, आरोग्य विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. यामुळे अनेक अपघात होत आहेत. अपुर्‍या कर्मचारीवर्गामुळे आरोग्यसेवा देताना अनेक अडचणी येत आहेत. या आरोग्य केंद्रांतर्गत 4,797 कुटुंबांतील 22,225 नागरिक येतात. लोकसंख्येच्या तुलनेत या आरोग्य केंद्रावर प्रचंड ताण येत आहे. आरोग्यसेविकांच्या मंजूर 15 पदांपैकी 8 पदे रिक्त आहेत. लसीकरण, विविध आजारांची नोंद व औषधोपचार, रोगप्रतिबंधक कामे, आरोग्यविषयक जनजागृती, गर्भवती स्त्रिया व विद्यार्थ्यांची तपासणी, सरकारच्या विविध योजना तळागाळात पोहचविणे आदी कामे रिक्त पदांमुळे करणे कठीण जात आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुढील काही दिवसांतच वाल्हे मुक्कामी येत आहे. अपुर्‍या कर्मचारीवर्गामुळे वैष्णवांना सेवा पुरविण्यास अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी तरी शासनाने त्वरित वाल्हे आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

रिक्त पदे भरण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेकडे रिक्त पदांच्या आकडेवारीचा अहवाल सादर केला आहे. रिक्त पदे भरल्यास आरोग्यसेवेचे कामकाज अधिक गतीने होईल. नागरिकांना वेळेवर व चांगली आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. लवकरच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे.

डॉ. विक्रम काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news