Valentine’s Week : व्हॅलेन्टाईनसाठी यंदा मावळातून गुलाबांचे विक्रमी उत्पादन

Valentine’s Week : व्हॅलेन्टाईनसाठी यंदा मावळातून गुलाबांचे विक्रमी उत्पादन

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा : फूल उत्पादक शेतकर्‍यांच्या कष्टाने यंदाचा रोझ-डे अर्थात गुलाब पुष्प दिन (दि. 7) गुलाबप्रेमींच्या आनंदाला बहर आणणारा आहे. व्हॅलेन्टाईन मौसमासाठी शेतकर्‍यांनी मेहनतीने केलेले नियोजन, पोषक हवामानाने दिलेली साथ आणि स्थानिक बाजारपेठांसह जगभरातून गुलाबांच्या फुलांना होत असलेल्या मोठ्या मागणीमुळे यंदा पुणे जिल्ह्यात विक्रमी संख्येने झालेल्या गुलाबांच्या फुलांचे उत्पादन बहरले आहे. यंदा मावळ तालुक्यातून युरोपीयन राष्ट्रांमध्ये निर्यातीसाठी किमान 75 लाख तर देशातील प्रमुख शहरांसाठी 30 ते 35 लाख गुलाबांची फुले या आठवड्यात रवाना होत आहेत.

सुमारे एक कोटीहून अधिक फुलांनी बहरणार देश-विदेशातील बाजारपेठा

व्हॅलेन्टाईन सिझनमध्ये यंदा मावळ तालुक्यातून एक ते सव्वाकोटी गुलाबांच्या फुलांचे उत्पादन झाले असून, गेल्या 24 वर्षांतील ते विक्रमी असल्याचे दैनिक पुढारीने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. स्थानिक बाजारपेठांमध्येही चांगला दर मिळत असल्याने शेतकरी कुटुंबात समाधानाचे वातावरण आहे. वीस फुलांच्या प्रती गुच्छाला प्रतवारीनुसार 250 ते 300 रुपये दर मिळतो आहे. तर, निर्यातक्षम फुलांसाठी अधिकृत निर्यातदार कंपन्यांकडून उत्पादक शेतक-यांना जागेवरच प्रतिफूल 14 ते 15 रुपये दर निश्चित झाला असल्याची माहिती पुणे जिल्हा फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी भेगडे यांनी दिली. गुरुवारी (दि. 8) मुंबईतून लास्ट शिपिंग झाल्यानंतर साधारणत: चार दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील एकूण उलाढाल आणि निर्यातदारांना फुलांसाठी मिळालेल्या दराची अधिकृत आकडेवारी समजेल, असेही त्यांनी सांगितले.

  •  व्हॅलेन्टाईन सिलेब्रेशनची सुरुवात आजच्या रोझ-डेपासून जगभरात होत आहे. प्रपोज-डे, चॉकलेट-डे, टेड्डी-डे, प्रॉमिस-डे, हग-डे, किस-डे आणि अखेच्या दिवशी 14 फेब्रुवारीस व्हॅलेन्टाईन-डे म्हणून प्रेमी युगलांकडून तो आठवडाभर जल्लोषात साजरा करण्यात येतो.
  •  त्यात रेड-रोझ फुलांना मानाचे स्थान दिले जाते. यात आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रिणी आणि स्नेहाची नाती व्यक्त करणा-यांची परंपराही कायम आहे. भारतातील शेतक-यांसाठी व्हॅलेन्टाईन सिलेब्रेशनने ठोस रोजगाराची देशविदेशी कवाडे खुली केली आहेत.
  •  भारतातून बंगळूर आणि पुणे परिसरातील ग्रामीण भागात गुलाब फुलांचे सर्वांधिक उत्पादन होते. दोन्ही ठिकाणचे शीतकालीन पोषक वातावरण त्याचे मूलभूत कारण आहे.

हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरचे मोठे योगदान

फूलशेतीला चालना देण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीने नेदरलँड सरकारच्या सहकार्याने 24 वर्षांपूर्वी स्थापित केलेल्या हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरमुळे (एचटीसी) मावळ तालुक्यातील गुलाब पुष्प शेती आता जगाच्या नकाशावर आली आहे. एचटीसीचे तत्कालीन संचालक डॉ. सुरेश धुमाळ आणि त्यांच्या उत्तरदायी अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या फूलशेती आणि पणन व विक्री कौशल्याच्या प्रशिक्षणाचा त्यात मोलाचा वाटा आहे. आशिया खंडातील हे पहिले केंद्र असल्याने कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे शेतकरी, सरपंच, केंद्र सरकार व राज्य शासनाच्या कृषी खात्यातील अधिकारी, शेती अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, फूल उत्पादनात स्वारस्य असलेल्या खासगी उद्योजकांचे सीईओ, राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी गेल्या 20 वर्षांत शास्ज्ञशुध्द पध्दतीने गुलाब फुलांची शेती आणि विक्री व्यवस्थापनाचे धडे याच केंद्रात गिरवले आहेत.

मावळात 2 हजार 200 एकरांवर फूलशेती

मावळ तालुक्यात 2 हजार 200 एकरावर गुलाबांच्या फुलांची शेती केली जाते. पवन मावळ, आंदर मावळ आणि नाणे मावळातील 400 फूल उत्पादक शेतकरी कुटुंबासह या व्यवसायात आहेत. यंदा अनुकूल वातावरण असल्याने महिन्यात एकरी 60 ते 80 हजार फुलांचे उत्पादन येत असल्याचे शिवाजी भेगडे यांनी सांगितले. राज्य सरकारने तळेगाव एमआयडीसीत उभारलेल्या देशातील पहिल्या फ्लोरिकल्चर पार्कच्या 350 एकर क्षेत्रावरील 97 ग्रीनहाऊस प्लॉट्समध्ये बहुतांश खासगी कंपन्यांची मालकी असून गुलाब, कार्नेशन, जर्बेरा, एन्थुरिअम, ट्युलिप आणि लिली आदी फुले आणि एक्झॉटिक व्हेजिटेबल्सचे (परदेशी भाजीपाला) उत्पादन घेतले जाते.

आम्ही दहा एकराच्या पॉलिहाऊसमध्ये वर्षभर फुलांचे उत्पादन घेतो. व्हॅलेन्टाईन सिझनसाठी डिसेंबर अखेरपासून विशेष नियोजन करतो. निर्यातक्षम गुलाब फुलांची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे राखण्यासाठी काळजी घेतली जाते. यंदा हवामान अनुकूल असल्याने चांगल्या दर्जाच्या फुलांचे अधिक उत्पादन होत आहे. गेल्या 20 वर्षांतील ते सर्वांधिक असून यंदा युरोपीयन आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये तीन लाखांवर फुले पाठविण्यात येत आहेत.

– पी. आर. जांभळे, फूलशेती तज्ज्ञ

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news