

Vaishnavi Hagawane Case Nilesh Chavan Police Custody:
पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी अटक झालेल्या नीलेश चव्हाणला पुणे न्यायालयाने तीन जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. नीलेश चव्हाणचं करिश्मासोबतचं संभाषण, मोबाईलमधून डिलीट केलेल्या डेटाची रिकव्हरी या कारणास्तव नीलेशला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. यानुसार कोर्टाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.
वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूप्रकरणी नीलेश चव्हाण हा सहआरोपी असून सात दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता. शुक्रवारी तो भारत- नेपाळ सीमेवरून सहा ते सात किलोमीटरवर असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली. तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी नीलेशचा माग काढत बेड्या ठोकल्या.
शुक्रवारी रात्री उशिरा नीलेशला पुण्यात आणण्यात आले. शनिवारी त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने नीलेशला तीन जूनपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली.
सरकारी वकिलांनी पोलिस कोठडीची का हवी यासाठी मांडलेले चार मुद्दे -
1. वैष्णवी हगवणे यांना करिष्मा सोबत मिळून नीलेश चव्हाणने त्रास दिल्याचा प्राथमिक अंदाज.
2. करिष्मा आणि शशांक हगवणेचा मोबाईल नीलेशकडे असून मोबाईल अजूनही सापडलेला नाही. करिष्मानेच पोलिस चौकशीत मोबाईल नीलेशकडे असल्याचे सांगितले होते.
3. नीलेश हा हगवणे कुटुंबाचा नातेवाईक नाही, मित्र आहे. तरी देखील त्याने वैष्णवी यांच्या बाळाचा ताबा घेतला होता.
4. वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी करिष्मा आणि नीलेश यांच्यात मोबाईलवर झालेले संभाषण.