वडगाव शेरी परिसर कचऱ्यात; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

वडगाव शेरी परिसर कचऱ्यात; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
Published on
Updated on
वडगाव शेरी : नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय स्वच्छ सर्वेक्षण आणि कचरा व्यवस्थापनावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत आहे. मात्र, चंदननगरसह खराडी, वडगाव शेरी परिसरातील मोकळ्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने कंटेनरमुक्त शहर केले आहे. यामुळे शहरामध्ये कचर्‍याचे कंटेनर  नाहीत.
नागरिकांच्या घरी घंटागाड्या जाऊन ओला आणि सुका कचरा संकलित करीत आहेत. त्यामुळे मोकळ्या जागेत कचरा साठण्याची शक्यता कमी झाली होती. मात्र, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विमाननगर, खराडी आणि चंदननगरमधील अनेक मोकळ्या जागेत कचरा टाकला जात आहे. या कचर्‍यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या कचर्‍याच्या ठिकाणी डुकरे आणि भटक्या कुत्र्यांच्या वावर आहे.
कचरावेचक घंटागाडी घरोघरी जाऊन कचरा गोळा करते.  तरी या मोकळ्या ठिकाणी अचानक कचरा कोण टाकते, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. जे नागरिक घंटागाडीकडे कचरा देत नाहीत, त्यांच्यावर अधिकारी कठोर कारवाई करत नाहीत.
त्यामुळे नागरिक बिनधास्त मोकळ्या जागेवर कचरा टाकत आहेत.  कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करणे किंवा त्यांचे प्रबोधनही प्रशासनाकडून केले जात नाही. यामुळे परिसरात ही समस्या निर्माण झाली आहे. परिसरातील आयटी पार्कमुळे भाडेकरूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे भाडेकरू दिवसा कामाला जातात. त्यामुळे त्यांना कचरावेचकांकडे कचरा देता येत नाही, असे नागरिक रस्त्यावर कचरा फेकतात.  काही जण कचरावेचकाला दरमहा पैसे द्यावे लागतात, हे पैसे वाचवण्यासाठी कचरा मोकळ्या जागेत टाकतात. मोकळ्या जागेत कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

या ठिकाणी टाकला जातोय कचरा…

वडगाव शेरीतील हरिनगर, रामवाडी येथील पूल, विमाननगर येथील गिगा स्पेससमोरील फुटपाथवर, शास्त्रीनगर चौक, आगाखान पॅलेसजवळील झाडामध्ये, साईनाथनगर, जुना मुंढवा रस्ता, खराडी बायपास ते जुना मुंढवा रस्ता, खराडीतील मोकळ्या जागा, चंदननगर येथील भाजी मंडईजवळ, कल्याणीनगर नदीपात्र, लोहगाव ते दर्गा रस्त्यावरील मोकळ्या जागेत कचरा टाकला जात आहे.
नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मोकळ्या जागेत कचरा टाकला जात आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. कचरा टाकणार्‍यांवर प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
-गणेश भोसेकर, रहिवासी, वडगाव शेरी
परिसरातील मोकळ्या जागेत कचरा टाकणार्‍यांवर प्रशासनाकडून नियमित कारवाई केली जात आहे. नाल्याभोवती पत्रे मारले आहेत, तरीही नागरिक कचरा टाकतात. कचरा टाकणार्‍यांची माहिती घेऊन लवकरच कारवाई केली जाईल.
– सुहास बनकर, सहायक आयुक्त, नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news