

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाबाधित मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण इतर मुलांच्या तुलनेत घटल्याचे निरीक्षण 'लॅन्सेट'मध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार नोंदविण्यात आले आहे. कोरोनाबाधित मुलांमधील बीसीजी लसीकरणात 2 टक्क्यांनी, हिपॅटिटिस-बी लसीकरणात 9 टक्क्यांनी आणि पोलिओ लसीकरणात 10 टक्क्यांनी घट झाली आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील संकलित माहितीनुसार लसीकरणाचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये पाच वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाची सद्य:स्थिती तपासण्यात आली. यामध्ये बीसीजी, हिपॅटिटिस-बी, डीपीटी-1 (डिप्थेरिया, परट्युसिस, टिटॅनस), डीपीटी-2 आणि डीपीटी-3, पोलिओ, मीझल्स या लसींचा समावेश करण्यात आला.
कोरोना महामारीचा लहान मुलांच्या लसीकरणावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. मीझल्सच्या लसीकरणामध्ये विशेष घट झाल्याचे दिसून आले नाही. कोरोनाबाधित मुले आणि ग्रामीण भागातील मुले यांच्या लसीकरणावर विशेष परिणाम झाल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, मुलांच्या लसीकरणामध्ये गेल्या 30 वर्षांतील सर्वाधिक घट कोरोनाकाळात झाल्याचे अधोरेखित केले आहे. जगात 2019 ते 2021 या कालावधीत डीटीपी लशींचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या लहान मुलांचे प्रमाण पूर्वीपेक्षा पाच टक्क्यांनी घटले आहे.
नियमित लसीकरण गरजेचे
लसीकरण हा बालकांच्या संगोपनातील महत्त्वाचा घटक असतो. पोलिओ, क्षयरोग, गोवर, कांजिण्या अशा विविध आजारांपासून लहान मुलांचे संरक्षण व्हावे आणि त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढावी, यादृष्टीने लसीकरणाला प्राधान्य देण्याचा सल्ला बालरोगतज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. पाच वर्षांखालील मुलांचे नियमित लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आले
आहे.
महापालिकेतर्फे करण्यात आलेले लसीकरण
वर्ष मुलांचे लसीकरण
2018-19 52,664
2019-20 56,548
2020-21 59,277
2021-22 55,543
असे असावे लसीकरणाचे वेळापत्रक
वयोगट लशींची नावे
जन्मजात बीसीजी, ओरल पोलिओ, हिपॅटिटिस बी
दीड महिना पीसीव्ही-1, पेन्टा-1, ओरल पोलिओ-1, रोटा-1, आयपीव्ही-1
अडीच महिने पेन्टा-2, ओरल पोलिओ-2, रोटा-2
साडेतीन महिने पीसीव्ही-2, पेन्टा-3, ओरल पोलिओ-3, रोटा-3, आयपीव्ही-2.
नऊ महिने एमआर-1, पीसीव्ही बूस्टर, व्हिटॅमिन ए-पहिला
16 ते 24 महिने एमआर-2, डीपीटी-बूस्टर, व्हिटॅमिन ए-दुसरा
5 ते 6 वर्षे डीपीटी-दुसरा बूस्टर
10 वर्षे टीडी
16 वर्षे टीडी