उताविळांचा ‘यशवंत’ची निवडणूक बिनविरोधला ‘खो’ : राहुल काळभोर

उताविळांचा ‘यशवंत’ची निवडणूक बिनविरोधला ‘खो’ : राहुल काळभोर
Published on
Updated on

लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा : 'यशवंत'ची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच निवडणूक बिनविरोध व्हावी, यादृष्टीने ज्येष्ठ नेते माधव आण्णा काळाभोर, दिलीप काळभोर, सुरेश घुले, महादेव कांचन व आम्ही सर्व मंडळींनी पुढाकार घेतला. राजकीय मतभेद असतानासुद्धा विरोधी गटाला बैठकांना बोलावत बिनविरोध निवडणुकीसाठी अथक परिश्रम घेतले. परंतु, राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उतावीळ झालेल्या मंडळींनी या प्रयत्नांना 'खो' घातला, अशी टीका महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर यांनी केली आहे. पैलवान राहुल काळभोर म्हणाले, राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने 'यशवंत'ला जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी अथक प्रयत्न करणार आहोत.

यासाठी देशाचे सहकारमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्यामार्फत प्रयत्न करणार आहे. नुकतेच केंद्र सरकारने देशभरातील 33 सहकारी साखर कारखान्यांच्या 1378 कोटी थकीत कर्जाची पुनर्रचना करण्यास मान्यता दिली आहे. त्यातील 619 कोटींचे व्याज पूर्णपणे माफ केलेले आहे. महाराष्ट्रातील 20 कारखान्यांच्या 861 कोटी रुपयांच्या कर्जाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. या धरतीवरच केंद्र व राज्य सरकारची मदत घेऊन 'यशवंत' सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. ज्येष्ठ नेते माधव अण्णा काळभोर यांनी सांगितल्याप्रमाणे 'यशवंत'ची एक इंचही जमीन न विकता शासनाच्या मदतीने कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची मदत घेण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.

कारखान्यातील जुने युनिट दुरुस्त करणे किंवा प्रतिदिन 2000 मे. टनाचे नवीन युनिट उभारण्याचे नियोजन आहे. कामगारांचे थकलेले वेतन व शेतकर्‍यांची प्रलंबित ऊसबिले देणे, ऊसतोड वाहतूकदारांचे थकलेले पैसे देणे, याला आमची प्राथमिकता राहील. मयत सभासदांच्या वारसांची नोंद करून सभासदांच्या मुलांसाठी विविध योजना राबविणार आहे. नावाने यशवंत असणार्‍या आपल्या यशवंत कारखान्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे. विरोधकांनी प्रचार सभांमध्ये टीका करण्यावर भर दिला असून, रयत सहकार पॅनेलने कारखाना सुरू करण्यावर भर देत त्याचे नियोजन आखले आहे, असे राहुल काळभोर यांनी सांगितले.

पॅनेलची रचना करताना 90 टक्के तरुण, सुशिक्षित व सहकाराची जाण असणारी मंडळी व 10 टक्के सहकारातला अनुभव असणारी मंडळी, असे समीकरण करून सर्वपक्षीय उमेदवारांचे पॅनेल तयार केले आहे. तालुक्यातील जनतेने 'यशवंत' सुरू करण्यासाठी व निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचे प्रयत्न पाहिलेले आहेत. त्यामुळे येणार्‍या 9 तारखेला 'किटली' या चिन्हावर शिक्का मारून अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल प्रचंड बहुमताने विजय होणार असल्याचा विश्वास देखील पैलवान राहुल काळभोर यांनी व्यक्त केला.

कृतघ्न मंडळी नैतिकता विसरली

माधव आण्णा कळभोर यांच्या जिवावर राजकारणात मोठी झालेली कृतघ्न मंडळी आज नैतिकता विसरून त्यांच्याच विरोधात दंड थोपटून बिनबुडाचे आरोप करीत आहेत,असेही राहुल काळभोर यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news