पुणे महापालिकेकडून पाणीगळती शोधण्यासाठी ’सेन्सर’चा वापर

पुणे महापालिकेकडून पाणीगळती शोधण्यासाठी ’सेन्सर’चा वापर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पाण्याची गळती शोधण्यासाठी महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने वडगाव जलकेंद्रापासून कात्रज येथील केदारेश्वर पाण्याच्या टाकीपर्यंतच्या मुख्य वाहिनीवर 13 ठिकाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात सुमारे 35 टक्के पाणीगळती होत असल्याने बहुतांश भागामध्ये पुरेसा पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत.

या पार्श्वभूमीवर सर्व भागात समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने सुमारे 3 हजार कोटी रुपये खर्चून समान पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले आहे. मात्र, या योजनेनंतरही पाणीगळतीवर नियंत्रण मिळेल, याची शंभर टक्के खात्री नाही. त्यामुळे महापालिकेकडून गळती शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.

महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर काही वाहिन्यांवरील व्हॉल्व्हला सेन्सर बसविले आहेत. या सेन्सरमुळे वाहिन्यांमधील पाण्याचा दाब, गळती शोधण्यास मदत होते, असा दावा या सेन्सर कंपनीने केला आहे. वडगाव जलकेंद्रातून तळजाई वनविभाग, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय जलकेंद्र आणि तेथून कात्रज येथील केदारेश्वर पाण्याच्या टाकीदरम्यानच्या व्हॉल्व्हवर बसविलेल्या सेन्सरच्या अहवालानुसार 13 ठिकाणी गळती असल्याचे समोर आले आहे.

यापैकी तळजाई वनविभागाच्या आवारामध्ये जेथे सेन्सरने लिकेज दर्शविले आहे, त्याठिकाणी खोदाई करून पाहण्यात आली. तेथे मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. उर्वरित ठिकाणीही लवकरच खोदाई करून गळती होत असल्याचे दिसून आल्यास दुरुस्ती करण्यात येईल. या सेन्सरचा अहवाल किती अचूकतेकडे जाणारा आहे, याचा अभ्यास करूनच त्याच्या कायमस्वरूपी वापराबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news