पुणे : पुढारी वृत्तसेवा : आगामी खरीप हंगामात सोयाबीन ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत 'घरचे बियाणे' मोहीम राबविण्यात येत आहे. त्यादृष्टीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयांना सूचना देण्यात आल्या असून, गावपातळीपर्यंत या मोहिमेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत; जेणेकरून सोयाबीन बियाणे खरेदीमधील शेतकर्यांची रक्कम वाचून अधिकाधिक क्षेत्र या पिकाखाली आणण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती पुणे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवडी यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील सोयाबीन पिकाखालील सरासरी क्षेत्र 47 हजार 230 हेक्टर इतके आहे.
मागील तीन खरीप हंगामांत सोयाबीन बियाण्यांची सरासरी 8 हजार 580 क्विंटल इतकी विक्री झालेली आहे. त्यादृष्टीने नियोजन करता खरीप 2024 मध्ये 12 हजार 75 क्विंटल सोयाबीन बियाण्यांची आवश्यकता अपेक्षित आहे. कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून (एनएससी) मिळून 2 हजार 520 क्विंटल, तर खासगी बियाणे कंपन्यांकडून 9 हजार 555 क्विंटल इतक्या सोयाबीनचा पुरवठा अपेक्षित आहे.
पुणे जिल्ह्यात सोयाबीन पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या क्षेत्राचा विचार करून गुणवत्तापूर्ण बियाण्यांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने खरीप 2023 प्रमाणेच यंदाच्या खरीप 2024 मध्येही घरचे बियाणे मोहीम राबवून सोयाबीनचे बियाणे शेतकर्यांनी घरचेच वापरासाठी प्रचार-प्रसिध्दी करण्यात येत आहे. ज्याचे स्वरूपही व्यापक करून जास्तीत जास्त शेतकर्यांचा सहभाग त्यामध्ये वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा