पुणे : 23 पैकी तब्बल 16 पंप बंद ; पुरंदर उपसा जलसिंचन प्रकल्पाला उतरती कळा

पुणे : 23 पैकी तब्बल 16 पंप बंद ; पुरंदर उपसा जलसिंचन प्रकल्पाला उतरती कळा

नीलेश झेंडे : 

दिवे : पुरंदर तालुका तसा दुष्काळी पट्ट्यात येत होता; मात्र पुरंदर उपसा जलसिंचन योजना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तालुक्याच्या विकासासाठी वरदायिनी ठरला. सुरुवातीच्या काळात योजना अतीशय सुरळीत सुरू होती. परंतु कालांतराने या योजनेला अक्षरशः ग्रहण लागले असून सध्या या योजनेचे भविष्य अक्षरशः अंधारात असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. पुरंदर उपसा जलसिंचन योजना ही एकूण सहा टप्प्यांत आहे. या टप्प्यात अनेक पंप नादुरुस्त आहेत, जे सुरू आहेत त्यांची देखभाल वेळेवर होत नसल्याचे वास्तव समोर आले. त्यातच दै. 'पुढारी'च्या माध्यमातून या प्रकल्पाची अगदी उरूळी कांचनपर्यंत पाहणी केली असता ठिकठिकाणी पाण्याला गळती असल्याचे निदर्शनास आले.

मुळात पुणे शहरातील सांडपाण्यावर ही योजना आहे. त्यामुळे केमिकलयुक्त पाणी असल्याने साधारण 15 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या योजनेच्या पंप हाऊसमधील मोटारी, लोखंडी पाईप व्हॉल्व्ह अक्षरशः गंजलेले आहेत. ही योजना फक्त उन्हाळ्यात सुरू असते. पावसाळा व नंतर किमान सहा महिने ही योजना बंद असते. या काळात प्रत्येक पंपहाऊसमधील मोटारींची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे, परंतु तसे काही होत नसल्याचे नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्यानेच सांगितले.

पंपहाऊस एकमध्ये चार पंप असून त्यापैकी एक पंप सुरू, तर तीन पंप नादुरुस्त आहेत. पंपहाऊस दोनमध्ये चार पंप असून त्यापैकी एक पंप सुरू आहे. पंपहाऊस तीनमध्ये चार पंप असून त्यापैकी दोन पंप सुरू आहेत. पंपहाऊस चारमध्ये चार पंप असून त्यापैकी एक पंप सुरू आहे. पंपहाऊस पाचमध्ये चार पंप असून त्यापैकी एक पंप सुरू आहे. पंपहाऊस सहामधे तीन पंप असून त्यापैकी एक पंप सुरू आहे. त्यामुळे या हंगामात साधारण 15 दिवसांपूर्वी सुरू झालेली योजना केवळ 4 दिवसांत बंद पडली. सोमवारी ती कशी-बशी योजना सुरू कली तर पाण्यासाठी शेतकरी हमरीतुमरीवर आले. एवढे पंप बंद असल्याने पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही.
परिणामी पाण्यासाठी शेतकरी आक्रमक होत आहेत.

शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता
या प्रकल्पाने दुष्काळी पट्ट्यात देखील उसासारखे पीक अगदी डौलदार येऊ लागले. येथील शेतकरी खूप कष्टाळू, त्यामुळे या पाण्याचा उपयोग करून दर्जेदार अंजीर, सीताफळाचे उत्पादनसुद्धा घेऊ लागला. मात्र, प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीमुळे तो अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news