

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरासह तालुक्यात शनिवारी (दि. 29) दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मोठ्या गावांच्या यात्रा सध्या सुरू आहेत. त्यामुळे यात्रेत या पावसाने विघ्न आणले. गेल्या दोन दिवसांपासून बारामती तालुक्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. शुक्रवार आणि शनिवार सलग दोन दिवस बारामतीत ढगाळ वातावरण असून, मध्येच पावसाच्या सरी कोसळत आहेत. शनिवारी दुपारी 12 वाजेनंतर बारामती शहरासह तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाला सुरुवात झाली.
पणदरे, कोर्हाळे बुद्रुक, होळ येथील ग्रामदैवतांच्या यात्रा सध्या उत्साहात सुरू आहेत. शनिवारी पणदरे व कोर्हाळे येथे दिवसभर मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, पावसाने त्यात विघ्न आणले. यात्रेकरूंचीही पणदरे येथे चांगलीच पळापळ झाली. कोर्हाळ्यातही सरी कोसळल्या.
हवामान विभागाने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवकाळीची शक्यता वर्तविल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. शहर तसेच बारामतीच्या पश्चिम भागात अनेकदा पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या आठवड्यात तालुक्यात ठिकठिकाणी अवकाळीने हजेरी लावली. अवकाळीनंतर कडक उन्हाने अंगाची लाहीलाही होत आहे.
मात्र, पुन्हा हवेत गारवा निर्माण झाल्याने उन्हापासून नागरिकांची सुटका झाली आहे. उन्हामुळे मेंढपाळ सकाळ व सायंकाळच्या सत्रात शेळ्या-मेंढ्या चारण्याचे काम करीत आहेत. उन्हाचा यात्रा- जत्रांवर परिणाम जाणवू लागला असून, करमणुकीच्या कार्यक्रमाला रात्री पसंती दिली जात आहे.
कित्येक वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद बारामतीत होत आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले उन्हाने हैराण झाली आहेत. ऊन-सावलीमुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी बागायती पट्टा असलेला तालुका उन्हाने अक्षरशः होरपळून निघाला असतानाच ढगाळ वातावरणाने दिलासा मिळाला आहे.