

पुणे : गणेश खळदकर
औद्योगिक वसाहतींच्या परिसरात विद्यापीठांची स्थापना करावी, तसेच एज्युकेशन एक्सलन्स झोनची निर्मिती करावी, अशी प्रमुख मागणी विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात ‘यूजीसी’च्या ‘प्रमोशन ऑफ इंडियन हायर एज्युकेशन ॲब्रॉड’ (पायहेड) या समितीच्या माध्यमातून करण्यात आली होती. यंदाच्या अर्थसंकल्पात त्याला मूर्त स्वरूप देण्यात आले आहे, याचा आनंद झाला असल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेचे (नॅक) तत्कालीन अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी दिली आहे.
डॉ. पटवर्धन म्हणाले, ‘यूजीसी’च्या ‘पायहेड’ समितीच्या रिपोर्टमध्ये देशात औद्योगिक वसाहतींच्या परिसरात विद्यापीठांची स्थापना अर्थात युनिव्हर्सिटी टाऊनशिपची उभारणी करावी, अशी मागणी 2005 साली करण्यात आली. यावर अनेक वर्षे चर्चा झाली. नीती आयोगाच्या बैठकीतही यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर अहमदाबादच्या गिफ्ट सिटीत याची अंमलबजावणी प्रायोगिकस्तरावर करण्यात आली. त्याच धर्तीवर नवी मुंबईतदेखील परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. विद्यापीठे आणि उद्योगधंदे यांनी एकत्र येत अशा प्रकारची टाऊनशिप उभी केली, तर विद्यापीठे - उद्योगधंदे या दोन्ही संस्थांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो, असे आम्ही सांगितले होते.
जगाचा विचार केला तर अशा प्रकारची अनेक उदाहरणे सांगता येतील. सिलिकॉन व्हॅलीमध्ये संगणकीय वाढ मोठ्या प्रमाणात झाली. त्यामध्ये स्टॅनफोर्ड आणि कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर हॉर्वर्ड आणि एमआयटीमुळे बोस्टनमध्ये जैवतंत्रज्ञान तसेच इतर क्षेत्रांचा विकास झाला. अशा प्रकारचे मॉडेल भारतात यावे, यासाठी ज्याप्रमाणे विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात ‘एसईझेड’ तयार करण्यात आले. तसेच, एज्युकेशन एक्सलन्स झोन तयार करावे, अशी मागणी केली होती. त्याच धर्तीवर युनिव्हर्सिटी टाऊनशिपची संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे दिसते.
युनिव्हर्सिटी टाऊनशिपची संकल्पना राबवताना काळजी घेणे गरजेचे आहे. परदेशी विद्यापीठे इथे आणण्याची कल्पना असू नये, तर आपल्या इथे असलेली चांगली विद्यापीठे सुदृढ कशी करता येतील याच्यावर दिला पाहिजे. टाऊनशिपमध्ये ज्यांना सामावून घ्यायचे ती विद्यापीठे परदेशी असो वा भारतीय सगळ्यांना समान न्याय देणे गरेजेचे असल्याचे डॉ. पटवर्धन यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठांमध्ये दिले जाणारे शिक्षण उद्योगांशी संबंधित असेल, असे नाही. त्यामुळे युनिव्हर्सिटी टाऊनशिपमध्ये उद्योगांच्या गरजांवर आधारित अभ्यासक्रमांची निर्मिती होईल. याचा उद्योगधंदे - शैक्षणिक संस्था दोघांना फायदा होणार आहे. उद्योगधंद्यांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपनीसाठी आवश्यक ज्ञानाचे पूर्ण प्रशिक्षण द्यावे लागते, तो रेडी टू वर्क नसतो. त्यामुळे अशा टाऊनशिपच्या माध्यमातून ही उणीव भरून निघणार असल्याचा आनंद आहे, असेदेखील डॉ. पटवर्धन यांनी स्पष्ट केले.