विद्यापीठ होणार ‘ऑक्सफर्ड ऑफ द सेंटर आशिया’

विद्यापीठ होणार ‘ऑक्सफर्ड ऑफ द सेंटर आशिया’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' म्हणून प्रसिद्ध असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ लवकरच आपल्या ज्ञानशाखा विस्तारत 'ऑक्सफर्ड ऑफ द सेंटर आशिया' बनण्याचा मार्गावर आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी (दि.29) मध्य आशियातील तीन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी पुणे विद्यापीठाच्या आशय पत्रावर (लेटर ऑफ इंटेट) स्वाक्षरी केली. विद्यापीठाच्या शिवाजी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कॅस्पियन युनिव्हर्सिटी, कझाकस्तानचे रेक्टर नुसेनोव्ह झोल्डास्बेक, इस्ट युरोपियन युनिव्हर्सिटी, जॉर्जियाचे रेक्टर डॉ. काखाबेर लाझाराहविली आणि किर्गिझ प्रजासत्ताक, किरगिझस्तानच्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे रेक्टर प्रा. अल्दारारालिव्ह असिलबेक, विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे आदी उपस्थित होते.

कझाकस्तानमधील कॅस्पियन युनिव्हर्सिटी, जॉर्जियामधील इस्ट युरोपियन युनिव्हर्सिटी आणि किरगिझस्तानमधील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या शिष्टमंडळाने सोमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट दिली. या वेळी त्यांनी आशय पत्रावर स्वाक्षरी करत शैक्षणिक आणि प्रशासकीय बाबींची देवाण-घेवाण करण्यासंबंधी चर्चा केली. या प्रसंगी डॉ. गोसावी म्हणाले, विद्यापीठ आपले पाय आंतरराष्ट्रीय स्तरावर रोवत असून ही आशय पत्रावरील स्वाक्षरी म्हणजेच आपल्या 'ऑक्सफर्ड ऑफ द सेंटर आशिया' होण्याच्या मार्गावरील पहिले पाऊल आहे.

सोमवारी झालेल्या हेतू पत्रावरील स्वाक्षरीमुळे सहभागी विद्यापीठ एकमेकांची कार्यप्रणाली जाणून घेऊन त्यांच्या विस्तारीकरणावर भर देणार आहेत. या अंतर्गत विद्यार्थी, शिक्षक आणि इतर प्रशासकीय कर्मचार्‍यांची देवाण-घेवाण करण्यासंबंधी फ्रेमवर्क तयार करण्यात येणार आहे. तसेच, उपलब्ध सुविधा आणि संसाधनांचे आदान-प्रदान करण्यावरही भर देण्यात येणार आहे. याशिवाय याअंतर्गत विविध चर्चासत्र, परिषद आणि कार्यशाळांचेही आयोजन करण्यात येईल. तसेच, विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी नवीन संयुक्त अभ्यासक्रमही बनविण्यात येणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news