

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुण्यातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (जीएमआरटी) संशोधकांनी नऊ अब्ज वर्षांपूर्वी आकाशगंगेत असलेले हायड्रोजन वायू व तार्यांचे अचूक मोजमाप करण्याचा शोध लावला आहे. जगातील सर्वांत मोठी दुर्बीण पुण्यात असल्याने हा शोध लावणे शक्य होत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्सच्या (NCRA-TIFR) खगोलशास्त्रज्ञांच्या चमूने विश्वनिर्मितीच्या सुरुवातीच्या काळानंतर आकाशगंगेतील हायड्रोजन वायू आणि तार्यांचे प्रमाण मोजण्यासाठी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचा (GMRT) पहिल्यांदाच वापर केला गेला आहे.
नऊ अब्ज वर्षांपूर्वी तारानिर्मिती करणार्या आकाशगंगा प्रामुख्याने तटस्थ हायड्रोजन वायूपासून बनलेल्या होत्या. हे आजच्या आकाशगंगांपेक्षा अगदी वेगळे आहे. ज्यांचे वस्तुमान बहुतेक तार्यांमध्ये आहे, असे त्यात दिसून आले आहे. आकाशगंगांमधील सामान्य पदार्थ बहुतेक अणू किंवा आण्विक हायड्रोजन आणि तार्यांच्या स्वरूपात असतात. आकाशगंगेच्या जीवनकाळात, अणू हायड्रोजन थंड होऊन आण्विक हायड्रोजनमध्ये रूपांतरित होतो आणि तोच पुढे कोसळून त्यापासून तारे बनतात. आकाशगंगेतील अणू, आण्विक आणि तारकीय सामग्रीचे सापेक्ष प्रमाण हे त्याच्या उत्क्रांतीच्या टप्प्याचे सूचक आहेत.
उदाहरणार्थ, एका अत्यंत विकसित आकाशगंगेतील बहुतांश वायू वापरला गेला असण्याची आणि त्या आकाशगंगेत वायूपेक्षा तार्यांमध्ये जास्त वस्तुमान असण्याची शक्यता आहे. आज जर आपण एका सामान्य आकाशगंगेचा विचार केला, तर तिच्यातील एकूण बॅरिओनिक पदार्थांपैकी जवळजवळ दोनतृतीयांश पदार्थ तार्यांमध्ये असतात. एकतृतीयांश अणू वायूमध्ये आणि फक्त 6 टक्के आण्विक स्वरूपात असतात.
अशाप्रकारे जवळपासच्या आकाशगंगेतील बहुतेक सामान्य पदार्थ तार्यांमध्ये असतात; परंतु या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही, सुरुवातीच्या आकाशगंगेतील परिस्थिती एक गूढ आहे आण्विक वायू एकूण वस्तुमानातील तार्यांशी तुलना करता येण्याजोगा आहे, ज्यामुळे या आकाशगंगा आजच्या आकाशगंगांपेक्षा खूप वेगळ्या असल्याचे संकेत मिळतात, असे मत पीएचडीचे विद्यार्थी आणि नवीन अभ्यासाचे प्रमुख लेखक आदित्य चौधरी यांनी व्यक्त केले आहे.
दुसरे खगोलशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे सहलेखक निस्सीम कणेकर यांच्या मते, आत्तापर्यंत या आकाशगंगांमधील अणू वायूचे द्रव्यमान हा या कोड्यामधील गहाळ झालेला एक महत्त्वाचा भाग आहे आणि जे आजच्या दुर्बिणींद्वारे मोजणे फार कठीण आहे. जवळपासच्या आकाशगंगांसाठी हायड्रोजन अणूंमधील अंदाजे 21 सेमी तरंगलांबीची एक वर्णक्रमीय रेषा अणुवायूचे वस्तुमान मोजण्यासाठी नियमितपणे वापरली जाते. तथापि, ही 21 सेमी रेषा खूपच कमकुवत आहे आणि सुरुवातीच्या विश्वातील दूरच्या आकाशगंगांमधून थेट रेषा शोधणे अत्यंत कठीण आहे.
संशोधकांनी केलेल्या सर्वेक्षणात आकाशातील निवडक प्रदेशांची जीएमआरटीच्या साह्याने सखोल निरीक्षणे केली आणि ब—ह्मांडाच्या सुरुवातीच्या हजारो आकाशगंगांचे सरासरी 21 सेंमी रेषा उत्सर्जन शोधण्यासाठी त्यांचे 21 सेंमी सिग्नल एकत्र केले. सरासरी 21 सेंमी लाइन सिग्नलच्या जीएमआरटीतील शोधामुळे आम्हाला आमचे लक्ष्य असलेल्या आकाशगंगांचे सरासरी अणुवायू वस्तुमान थेट मोजता आले आणि या सरासरी अणू वायू वस्तुमानाची त्यांच्या सरासरी आण्विक वायू वस्तुमान आणि सरासरी तारकीय वस्तुमानाशी तुलना करता आली.
आम्हाला असे आढळले की, 9 अब्ज वर्षांपूर्वीच्या सुरुवातीच्या विश्वातील आकाशगंगांची रचना आजच्या आकाशगंगांपेक्षा नाटकीयरीत्या वेगळी होती. सुरुवातीच्या आकाशगंगांचे बहुतांश वस्तुमान, म्हणजे सुमारे 70%, अणुवायूच्या रूपात आहे आणि तार्यांमध्ये केवळ 16% वस्तुमान आहे, असेही चौधरी यांनी सांगितले.
सध्याचा अभ्यास सुरुवातीच्या आकाशगंगांबद्दल दीर्घकाळ चाललेल्या वादाचे निराकरण करतो आणि या आकाशगंगा कशापासून बनल्या आहेत याचे संपूर्ण चित्र स्पष्ट करते. आपल्याला आता माहीत आहे की, सुरुवातीच्या विश्वातील आकाशगंगा बहुतेक तटस्थ वायूने बनलेल्या होत्या. गेल्या नऊ अब्ज वर्षांमध्ये, आकाशगंगांमधील वायूचा हा मोठा साठातार्यांमध्ये रूपांतरित झाला, ज्यामुळे आपल्या आकाशगंगासारख्या आकाशगंगा निर्माण झाल्या, ज्यांच्या वस्तुमानात तार्यांचे वर्चस्व आहे, असे मत अभ्यासक जयराम चेंगलूर यांनी व्यक्त केले आहे.