

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : दुचाकीला भरधाव क्रेनची धडक बसून झालेल्या अपघातानंतर क्रेनचे चाक अंगावरून गेल्याने आजी व नातीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.5 ) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास शिक्रापूर (ता. शिरुर) येथे हिवरे रस्त्यालगत घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मैनाबाई गुरुनाथ राठोड (वय 55) असे आजीचे तर शिवानी संदीप राठोड(वय दीड वर्ष, रा. दोघेही रा. वाबळेवाडी, विरोळे वस्ती, शिक्रापूर, ता. शिरुर, जि.पुणे, मूळ रा. कर्नाटक) असे मृत्यू झालेल्या नातीचे नाव आहे.
याबाबत संदीप गुरुनाथ राठोड (वय 31, रा. वाबळेवाडी, विरोळे वस्ती, शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे, मूळ रा. कर्नाटक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन क्रेन चालक लाल बाबू कुमार (सध्या रा. सणसवाडी, ता. शिरुर, जि. पुणे, मूळ रा. बिहार) याच्याविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर (ता. शिरुर) येथील हिवरे रस्त्याने गुरुनाथ राठोड व मैनाबाई राठोड हे दांपत्य त्यांच्या दीड वर्षीय शिवानी या नातीला घेऊन दुचाकी ( एमएच 12 आरबी 6635) वरून चालले होते.
देवखल मळा येथे पाठीमागून भरधाव आलेल्या क्रेनची (एमएच 12 टीएच 0372) राठोड यांच्या दुचाकीला धडक बसली. त्यात राठोड दांपत्य नातीसह रस्त्यावर पडले. क्रेन चालक क्रेन घेऊन पुढे जाताना क्रेनचे चाक मैनाबाई यांच्यासह दीड वर्षीय शिवानी या नातीच्या अंगावरून गेल्याने त्या दोघीही जागीच ठार झाल्या. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे व पोलिस जवान प्रतिक जगताप हे पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा