Under-19 Sports Competitions Postponed: अकरावी प्रवेशामुळे शालेय स्पर्धा लांबणीवर
सुनील जगताप
पुणे : अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अनिश्चितता आणि उशिरामुळे शालेय स्पर्धांच्या आयोजनात आणि वेळापत्रकात अडचणी निर्माण होत आहेत. पर्यायाने 14 आणि 17 वर्षांखालील शालेय स्पर्धांचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असून, 19 वर्षांखालील गटाच्या सर्व स्पर्धा लांबणीवर जाण्याची शक्यता क्रीडा विभागातील अधिकार्यांनी वर्तविली.
भारतीय खेळ प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय शालेय स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेसाठी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागीय आणि राज्यस्तरीय पातळीवर 49 क्रीडाप्रकारांतील स्पर्धांमधून खेळाडू राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत असतात. दर वर्षी 14, 17 आणि 19 वर्षांखालील तीनही वयोगटांच्या स्पर्धा साधारणतः जुलै महिन्यामध्ये सुरू होत असतात. मात्र, जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा आला, तरी अद्यापही शालेय स्पर्धा सुरू झालेल्या नाहीत.
या स्पर्धांच्या नियोजनामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेचा अडथळा निर्माण झाला आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्टपर्यंत चालणार असल्याने शालेय स्पर्धेमध्ये सहभागी होणारा 19 वर्षांखालील वयोगटातील खेळाडू आणि महाविद्यालयांची नोंदणी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे 14 आणि 17 वर्षांखालील वयोगटातील खेळाडू आणि शाळांनी आपली नावनोंदणी ऑनलाइन पद्धतीने देण्यास सुरुवात केली असून, 25 जुलैपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने मुदत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 19 वर्षांखालील वयोगटाच्या खेळाडू आणि महाविद्यालयांच्या नावनोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक विद्यार्थी मैदानात...
शासनाचा क्रीडा विभाग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धा दर वर्षी भरवली जाते. या स्पर्धेत तब्बल 49 क्रीडाप्रकारांचा समावेश असतो. मात्र, अनेक शाळा आणि महाविद्यालये त्यांच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी प्रोत्साहित करीत नसल्याचे आढळून आले आहे. शासनाने प्रत्येक मैदानात ही मोहीम राबवून प्रत्येक विद्यार्थ्याला एकतरी खेळ खेळणे बंधनकारक करण्याची गरज असल्याचे माजी क्रीडापटूंनी सांगितले.
अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने 19 वर्षांखालील वयोगटाची नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे या वयोगटाच्या नावनोंदणीला मुदतवाढ देण्याचा विचार सुरू आहे, तर 14 आणि 17 वर्षांखालील गटाच्या खेळाडू आणि शाळांच्या नोंदणीला 25 जुलै अखेरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये तब्बल 49 क्रीडाप्रकार असून, प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांनी प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एक खेळ क्रमप्राप्त करावे; जेणेकरून खेळाडूंना पुढील भविष्यातील ग्रेस गुणांसाठी उपयुक्त ठरू शकेल.
जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे

