पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहातील (रिफेक्ट्री) जेवणात पुन्हा एकदा अळ्या आढळल्या आहेत. जेवणात अळ्या आढळण्याचा प्रकार विद्यापीठात वारंवार घडत आहेत. परंतु, विद्यापीठ प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन जेवणाच्या दर्जाबाबत गंभीर नसल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी केला आहे.
विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीत विद्यापीठाने मान्य केलेल्या दरात जेवण दिले जाते. त्यामुळे शेकडो विद्यार्थी मासिक पास काढून रिफेक्ट्रीत जेवतात. कंत्राटी पद्धतीने रिफेक्ट्री चालवली जाते. मात्र, कंत्राटदाराकडून जेवणाबाबत आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते. कारण, विद्यार्थ्यांच्या जेवणात झुरळ, अळी निघण्याचे प्रकार वांरवार होत असले, तरी विद्यापीठ प्रशासन याकडे सपशेल डोळेझाक करीत आहे. मेसमध्ये स्वच्छते बाबतीत हलगर्जीपणा नसावा.विद्यार्थ्याचा आरोग्याशी असा खेळणार्यांवर तत्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी अभिषेक पुजारी यांनी केली.
मी विद्यापीठात यंदा नवीनच प्रवेश घेतला असून, एम. ए. पॉलिटिकल सायन्सच्या प्रथम वर्षात शिकत आहे. रिफेक्ट्रीमध्ये मंगळवारी रात्री जेवणासाठी आल्यानंतर कोबीची भाजी खात होतो. यामध्ये काही घास खाल्ल्यानंतर त्यामध्ये भलीमोठी अळी आढळून आली. असे प्रकार यापूर्वी देखील घडले आहेत. परंतु, याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे नेमकी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- अभिषेक शेलूकर, विद्यार्थी